कर्जबाजारीपणामुळे पुण्यातील व्यावसायिकाची पत्नीसह आत्महत्या -कोल्हापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:12 AM2019-06-29T01:12:05+5:302019-06-29T01:13:34+5:30
पुण्यातील व्यावसायिक विनोद रमाकांत जोशी (वय ५९, रा. पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पत्नी मीना जोशी (५५) यांच्यासह विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
कोल्हापूर : पुण्यातील व्यावसायिक विनोद रमाकांत जोशी (वय ५९, रा. पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पत्नी मीना जोशी (५५) यांच्यासह विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
या घटनेत मुलगा श्रेयस (वय १८) यानेही विषारी औषध प्राशन केले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. लक्ष्मीपुरी परिसरातील हॉटेल पल्लवी येथे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. व्यावसायिक नुकसान व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील व्यावसायिक विनोद जोशी हे पत्नी मीना व मुलगा श्रेयस यांच्यासोबत सोमवारी (दि. २४) कोल्हापुरात येऊन हॉटेल पल्लवी येथील रूम नं. ३१० मध्ये राहिले. पहिले दोन दिवस त्यांचा हॉटेलचे वेटर व कर्मचाऱ्यांशी संपर्क होता. वारंवार ते ‘आम्हाला डिस्टर्ब करू नका, काही लागले तर मागून घेऊ,’ असे सांगत होते. बुधवार (दि. २६)नंतर मात्र त्यांचा संपर्क कमी झाला. कर्मचाऱ्यांनीही त्यांना विनाकारण डिस्टर्ब केले नाही. शुक्रवारी त्यांचा हॉटेल सोडण्याचा कालावधी संपणार असल्याने रात्री आठच्या सुमारास वेटर त्यांच्या रूमजवळ गेला; परंतु या ठिकाणी त्याला उग्र वास आला तसेच त्याने दरवाजा ठोठावला असता आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने तत्काळ व्यवस्थापकांना ही बाब सांगितली. त्यांनी तत्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
काही वेळातच पोलीस या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी पहारीच्या साहाय्याने रूमचा दरवाजा तोडला असता आत बेडवर पती, पत्नी मृतावस्थेत तर मुलग्याच्या श्वासोच्छ्वास सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ मुलग्याला रुग्णवाहिकेमधून ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. या तिघांनीही विषारी औषध प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याजवळ आत्महत्या केल्याची चिठ्ठी आढळली. त्यावर २६ तारखेचा उल्लेख आहे. पोलिसांनी ती जप्त केली असून त्यात उल्लेख असलेल्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी तपास करीत होते.
आत्महत्या स्वखुशीने
जोशी यांनी आत्महत्येसंदर्भात लिहिलेल्या चिठ्ठीत व्यापारातील नुकसान व कर्जबाजारीपणामुळे आम्ही तिघेही स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. त्या चिठ्ठीत खाली नातेवाइकांचे मोबाईल क्रमांक दिले असून, त्यांच्याशी संपर्क साधावा असेही म्हटले आहे.