कर्जवसुलीच्या तगाद्याने महिलेची आत्महत्या

By admin | Published: January 6, 2017 12:29 AM2017-01-06T00:29:57+5:302017-01-06T00:29:57+5:30

रेंदाळमधील घटना : मुलांच्या शिक्षणासाठी बचतगटाच्या माध्यमातून घेतले होते कर्ज

Suicides of a woman with debt relief | कर्जवसुलीच्या तगाद्याने महिलेची आत्महत्या

कर्जवसुलीच्या तगाद्याने महिलेची आत्महत्या

Next

हुपरी : कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी बचतगटाच्या माध्यमातून फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचा सातत्याने सुरू असणारा वसुलीचा तगादा व समाजात होणाऱ्या मानहानीला वैतागून रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील संगीता शिवाजी काटे (वय ३३, रा. लक्ष्मी नगर) या महिलेने गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये संगीता या पती शिवाजी व दोन मुलांसह राहत होत्या. त्यांचे पती शिवाजी हे गवंडी काम करतात. कुटुंबांच्या उदरनिर्वाहाबरोबरच मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे घरी पैशांची गरज भासू लागली होती. त्यामुळे त्यांनी कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी स्थानिक बचतगटाच्या माध्यमातून एका फायनान्स कंपनीकडून काही कर्जाऊ रक्कम घेतली होती. त्याच्या काही हप्त्यांची परतफेड त्यांनी वेळेत केलेली आहे. चलन बंदीबरोबरच रेंदाळमधील यंत्रमाग व्यवसायही काही कारणाने बंद पडल्याने मध्यंतरी काही दिवस दोघा पती-पत्नींना काम मिळाले नव्हते. परिणामी, पैशांची चणचण मोठ्या प्रमाणात भासू लागल्याने फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकीत जाऊ लागले. बचतगटातील महिला व फायनान्स कंपनीचे वसुली कर्मचारी यांच्याकडून वसुलीसाठी सातत्याने एकसारखा तगादा सुरू झाला होता. कर्जाऊ घेतलेल्या रकमेचे थकीत हप्ते नियमानुसार दंडासह आम्ही भरण्यास तयार आहोत, असे सांगूनही वसुली कर्मचारी दिवस-दिवसभर त्यांच्या घरात थांबत असत. त्यामुळे संगीता यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले होते.
गुरुवारी सायंकाळी बचतगटाच्या महिला परत वसुलीसाठी घरी येणार असल्याचे समजताच त्यांनी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. संगीता यांच्या पश्चात पती शिवाजी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या घटनेची तक्रार पती शिवाजी यांनी हुपरी पोलिसांत दिली आहे. (वार्ताहर)


फायनान्स कंपन्यांबाबत संताप
फायनान्स कंपनीच्या अन्यायी वसुलीच्या तगाद्यामुळे संगीता यांनी केलेल्या आत्महत्येमुळे दोन अल्पवयीन मुले आई विना अनाथ झाली आहेत. यामुळे फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त होत येत आहे.

Web Title: Suicides of a woman with debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.