महिलांकडून सुजित मिणचेकर धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:12 AM2018-08-03T00:12:24+5:302018-08-03T00:12:29+5:30
इचलकरंजी : येथील प्रांत कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला गुरुवारी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना ‘पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्या, मगच पुढे बोला,’ असे म्हणत उपस्थित कार्यकर्त्यांसह महिलांनी धारेवर धरले. जोरदार घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर आंदोलकांच्या संतप्त भूमिकेमुळे मिणचेकर यांनी ‘आरक्षणासाठी पाठपुरावा करू,’ अशी ग्वाही देत काढता पाय घेतला.
आंदोलनस्थळी गेल्यावर आमदार मिणचेकर यांनी आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न व पाठपुरावा याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र, आंदोलकांनी त्यांना ‘सहानुभूती नको, पदाचा राजीनामा देऊन सहभागी व्हा,’ असे म्हणत धारेवर धरले. तर महिला आंदोलकांनी, ‘तुम्ही वैयक्तिक पाठिंबा देण्यासाठी आलात की, पक्षाच्यावतीने पाठिंबा देणार आहात, असे म्हणत राजीनामा द्या,’ अशी मागणी केली. अनेक प्रश्नांचा भडिमार करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे गोंधळ उडाला.
अचानकपणे कार्यकर्ते संतप्त बनल्याने तणाव निर्माण झाला. त्यावर डॉ. मिणचेकर हे आरक्षणासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत निघून गेले.
यावेळी सायली लायकर, सुनीता मोरबाळे, सिंधू शिंदे, उर्मिला गायकवाड, सोनाली आडेकर, संगीता सूर्यवंशी, ज्योती माने, आदींसह समाजातील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.