सुळकूड न्यूज सुळकूड येथे माय लेकरांच्या मृत्यू ने हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:23 AM2021-05-22T04:23:30+5:302021-05-22T04:23:30+5:30
कसबा सांगाव : आईच्या मृत्यूनंतर तासभरातच मुलग्याचा मृत्यू झाल्याने सुळकूड (ता. कागल) येथे खळबळ उडाली आहे. आतापर्यंत सुळकूड येथे ...
कसबा सांगाव : आईच्या मृत्यूनंतर तासभरातच मुलग्याचा मृत्यू झाल्याने सुळकूड (ता. कागल) येथे खळबळ उडाली आहे. आतापर्यंत सुळकूड येथे २७ रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत; तर चौघांचा मृत्यू झाला आहे.
याबाबतची माहिती अशी, येथील शकुंतला रघुनाथ पाटील (वय ८२) व त्यांचा मुलगा संजय रघुनाथ पाटील (४३) हे पाॅझिटिव्ह आल्याने ते चार दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी शकुंतला यांचा मृत्यू झाला आणि तासाभरातच मुलग्याचा मृत्यू झाला. ही बातमी सुळकूड येथे समजताच खळबळ माजली.
आतापर्यंत या ठिकाणी २७ लोक पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यांमधील चार लोकांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी स्राव दिलेले नागरिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार होम क्वारंटाईन होत नसल्याने ही समस्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या ठिकाणी विनाकारण मोटरसायकली घेऊन फिरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गुरुवारी (दि. २०) कागल पोलिसांनी सुमारे २७ गाड्या जप्त केल्या आहेत. मात्र नागरिकच घरात थांबत नसल्याने पाॅझिटिव्हचे प्रमाण वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
---------------------------------------------------------------------
चौकट :
सर्व्हेला आशा, अंगणवाडी सेविका गेल्यानंतर नागरिक त्यांना खरी माहिती देत नाहीत. त्याचप्रमाणे ग्रामदक्षता कमिटीने प्रभावी काम करणे गरजेचे आहे. विलगीकरण कक्षात चौदा दिवस राहावे लागते म्हणून नागरिक खरी माहिती देत नाहीत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. तसेच एकाच भागात चार मृत्यू झाले आहेत; त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.