सुमंत यांनी वैचारिक बहुजनवाद रुजविला
By admin | Published: April 15, 2015 11:51 PM2015-04-15T23:51:16+5:302015-04-15T23:59:35+5:30
अशोक चौसाळकर : भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे झाली शोकसभा
कोल्हापूर : महाराष्ट्रातील वैचारिक क्षेत्रात बहुजनवाद रुजविण्याचे काम डॉ. यशवंत सुमंत यांनी केले. त्यांचा बहुजनवाद हा महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांच्या समन्वयातून निर्माण झाला होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी बुधवारी येथे केले.
पुरोगामी विचारवंत डॉ. यशवंत सुमंत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित शोकसभेत ते बोलत होते. बिंदू चौकातील रेड फ्लॅग बिल्डिंगमधील या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. विलास रणसुभे होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, डॉ. सुमंत यांनी महाराष्ट्राला महात्मा गांधीजींची ओळख ‘बहुजनवादी गांधी’ म्हणून करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्म समजावून सांगताना त्यांनी जातींवर आधारित संघटना टिकणार नाहीत, हे आंबेडकर यांचे विचार पुराव्याने मांडले. शिवाय त्यांनी गांधीवाद्यांना आंबेडकरवाद, तर डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांना गांधीवाद समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आपण पुढे नेले पाहिजेत, असे ते आवर्जून सांगत होते.
प्रा. रणसुभे म्हणाले, राज्यशास्त्रातील स्त्रीवाद, पर्यावरणवाद, जागतिकीकरण हे लोकांना समजावून सांगण्याचा डॉ. सुमंत यांनी प्रयत्न केला. त्यांनी ‘महाराष्ट्रातील जातविषयक विचार’ या ग्रंथात राज्यातील जातीय राजकारणाचे अपुरेपण स्पष्ट केले. महाराष्ट्राला सैद्धान्तिक राजकारणावर विचार करण्याची सवय डॉ. सुमंत यांनी लावली. ते राजघराण्याशी संबंधित व्यक्ती असूनदेखील सामान्य व्यक्तीच्या राजकारणाबद्दल त्यांना आस्था, आदर होता. त्यांच्यासाठी न्याय मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.
सभेत मिलिंद यादव, शिवाजी शिंदे, बी. एल. बरगे, दिलीप पवार, सुभाष वाणी यांची भाषणे झाली. ‘भाकप’च्या शहर शाखेचे सचिव अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविकातून डॉ. सुमंत यांची डाव्या विचारांशी असलेली बांधीलकी स्पष्ट केली. जिल्हा सचिव एस. बी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)