सुमनताई मंगळवारी अर्ज भरणार
By admin | Published: March 23, 2015 11:58 PM2015-03-23T23:58:59+5:302015-03-24T00:13:00+5:30
बिनविरोधचे आवाहन : सर्वपक्षीय पाठिंबा, तरीही अपक्षांची गर्दी
तासगाव : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी- साठी राष्ट्रवादीतर्फे मंगळवारी २४ मार्च रोजी आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सर्वच पक्षांनी सुमनतार्इंना पाठिंबा दिला असला तरी अपक्षांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीसाठी आता अपक्ष उमेदवारांच्या विनवण्या करण्याची वेळ राष्ट्रवादी नेत्यांवर आली आहे. पोटनिवडणुकीसाठी आज, सोमवारी आठ जणांनी १२ अर्ज खरेदी केले. आतापर्यंत ३७ जणांनी ५३ उमेदवारी अर्ज नेले आहेत. दरम्यान, उद्या, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने श्रीमती सुमनताई पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई यांनी दिली.श्रीमती पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, विलासराव शिंदे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत विनंती करण्यात आली असल्याचेही देसाई म्हणाले.तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ही निवडणूक बहुचर्चित झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तासगावात येऊन, मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सुमनतार्इंची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर ‘निवडणूक की बिनविरोध’ हा विषय गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे. राष्ट्रवादीने केलेल्या आवाहनानुसार सर्वच पक्षांनी सुमनतार्इंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही अपक्षांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे बिनविरोधच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले दिसत नाही. उमेदवारी अर्ज खरेदी करणे व दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या दि. २४ पर्यंतच आहे. आतापर्यंत ३७ जणांनी ५३ अर्ज खरेदी केले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे निवडणूक यंत्रणाही सज्ज झाली आहे. उद्याचा दिवस महत्त्वाचा असल्याने जिल्ह्याच्या नजरा या प्रक्रियेकडे लागून राहिल्या आहेत. (वार्ताहर)
अपक्षांचे अडथळे...
सर्वपक्षीय पाठिंबा मिळूनही बिनविरोधसाठी राष्ट्रवादीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सर्वच पक्षांनी सुमनतार्इंना पाठिंबा दिला असला तरी, उमेदवारीसाठी इच्छुकांनी खरेदी केलेल्या अर्जांची संख्या मोठी आहे. या अपक्ष उमेदवारांच्या अडचणी राष्ट्रवादीसमोर वाढल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी सोमवारी आठ जणांनी १२ अर्ज खरेदी केले आहेत, तर आतापर्यंत ३७ जणांनी ५३ उमेदवारी अर्ज नेले आहेत. येत्या २७ मार्च रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उर्वरित तीन दिवसात अपक्षांनाही बिनविरोधसाठी आवाहन करण्याची वेळ राष्ट्रवादी नेत्यांवर येणार आहे.