उन्हाळा अन् निवडणुका..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:49 PM2019-03-04T23:49:09+5:302019-03-04T23:49:14+5:30
चंद्रकांत कित्तुरे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदा तसे हवामानच अनिश्चित असे आहे. चार दिवस थंडी अन् चार दिवस ऊन ...
चंद्रकांत कित्तुरे
उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदा तसे हवामानच अनिश्चित असे आहे. चार दिवस थंडी अन् चार दिवस ऊन असे अनेकवेळा पाहायला मिळाले. हवामानाशी लगेच जुळवून घेण्याची ज्यांची प्रकृती नाही त्यांना याचा भरपूर त्रासही झाला. कारण हवामान बदलले की, अशा लोकांची तब्येत बिघडते. दवाखान्याला जावे लागते. त्यात दोन-चार दिवस जातात. बदललेल्या हवामानाशी शरीर जुळवून घेतंय न घेतंय तोपर्यंत पुन्हा थंडी, बोचरे वारे किंवा उकाडा सुरू होतोय. त्यामुळे सतत अस्वस्थता, मनाची घालमेल होतेय. बरे, यावर उपाय काहीही नाही. डॉक्टरच सांगतात. हवामान सारखं बदलतंय. व्हायरल आहे. औषध, गोळ्या घ्या. होईल कमी. हा! वाईटातही चांगले म्हणतात, तसे डॉक्टरांच्यादृष्टीने मात्र ही इष्ट आपत्तीच असते. कारण रुग्णालयात दररोज रुग्णांची संख्या भरपूर राहते. व्यवसाय चांगला चालतो. विशेषत: गल्लीबोळातल्या डॉक्टरांची यात अधिक चलती असते. कारण किरकोळ आजाराला कोणी मोठ्या रुग्णालयात जात नाही.
असो! हा हवामानात सातत्याने होणारा बदल आता थांबेल. कारण उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्याबरोबरच आता निवडणुकीचे वारेही वाहू लागले आहेत. राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूकही होईल की काय, असे वाटत होते. मात्र, ती शक्यता मावळून आता केवळ लोकसभेची निवडणूक होणार आहे. राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी निश्चित समजून प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यांच्यादृष्टीने आता किमान निवडणूक होईपर्यंत तरी मतदार हाच राजा आहे. या राजाला कुर्निसात करून खूश केल्याशिवाय मतांच्या झोळीत त्यांचे दान पडणार नाही, हे या इच्छुकांनी ओळखले आहे. राजकीय पक्षांनीही या निवडणुकीची रणदुदुंभी वाजविण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत स्थानिकांपेक्षा राष्टÑीय, मतदारांच्या भावनेला हात घालणारे, त्यांची अस्मिता पेटविणारे विषयच अधिक प्रभावी ठरतात. हे राजकीय पक्षांनीही ओळखले आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळावर केलेला हवाई हल्ला, त्यानंतरचे ‘अभिनंदन’चे पाक सैन्याच्या ताब्यात सापडणे, त्याची झालेली सुटका, यामुळे सध्या देशात जणू काही युद्धज्वर चढला आहे. त्याचेच रूपांतर निवडणूक ज्वरात करून आपली पोळी भाजून पुन्हा सत्तेवर येण्याचा प्रयत्न भाजपचा आहे, असा आरोप सर्व विरोधी पक्षांनी केला आहे. यात
खरे कोण, खोेटे कोण? हे निवडणूक निकालच सांगेल.
कोल्हापुरातही निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा नवा फंडा शोधला जात असतो. त्याप्रमाणे यावेळीही नवे फंडे शोधले जात आहेत. डिजीटलचा जमाना असल्यामुळे पारंपरिक प्रचारपद्धतीबरोबरच नवतंत्रज्ञानाच्या सहायाने डिजीटल प्रचारावर भर दिला जात आहे. सोशल मीडियावरील मेसेज अशा प्रचारकी थाटाच्या संदेशांनी भरून वाहू लागले आहेत.
सध्या कोल्हापुरात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसाठी विद्यमान खासदारांनी ‘मिसळ पे परिवर्तन’ ही मोहीम सुरू केली आहे. मिसळ खात-खात सर्वांशी गप्पा मारायच्या, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या, आपली भूमिका मांडायची आणि मतांचे दान आपल्याच पदरात पडले पाहिजे यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना
करावयाचे, अशी ही मोहीम आहे. विरोधी उमेदवार याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतो, हेही मतदारांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. अर्थात ही पूर्वतयारी आहे. निवडणूक जाहीर होताच प्रचाराला धुमधडाक्यात प्रारंभ होईल. त्यात वेगवेगळे रंग भरले जातील. साम- दाम-दंड-भेद या नीतीचा वापर केला जाईल. मात्र, मतदारही आता सुज्ञ झाला आहे. योग्य उमेदवारालाच तो संसदेत आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देईल, हे निश्चित आहे.
ऐन परीक्षांच्या हंगामात या निवडणुका होत आहेत. या निवडणूक ज्वराचा त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होणार नाही, अशी आशा करायला हरकत नाही. कारण निवडणुकीपेक्षा आपले शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे हे त्यांना इतर कुणी सांगायची गरज नाही, इतके ते सुज्ञ आहेत. हा उन्हाळा जसा सर्वसामान्य नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा काढतो, तशा या निवडणुकाही राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार, कार्यकर्ते यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहायला लावणार आहेत. बघूया, निवडणुकीच्या घोडा मैदानात कोण, किती घाम गाळतो, अन् निकालावेळी काय घडते ते!