दिवसा उन्हाचा, रात्री पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 08:46 PM2020-09-04T20:46:00+5:302020-09-04T20:46:53+5:30
दिवसभर अंग भाजून काढणारे ऊन, सर्वांगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि रात्री धो-धो कोसळणारा पाऊस असा विचित्र हवामानाचा सामना कोल्हापूरकरांना करावा लागत आहे. वादळवाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे मान्सून संपल्यातच जमा आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे मात्र काढणीसाठी आलेल्या पिकांना फटका तर बसत आहेच; शिवाय सर्दी, तापाच्या रुग्णांतही वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे.
कोल्हापूर : दिवसभर अंग भाजून काढणारे ऊन, सर्वांगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि रात्री धो-धो कोसळणारा पाऊस असा विचित्र हवामानाचा सामना कोल्हापूरकरांना करावा लागत आहे. वादळवाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे मान्सून संपल्यातच जमा आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे मात्र काढणीसाठी आलेल्या पिकांना फटका तर बसत आहेच; शिवाय सर्दी, तापाच्या रुग्णांतही वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे.
मघा संपून सध्या पूर्वा फाल्गुनी अर्थात सुनांचा पाऊस सुरू आहे. १३ सप्टेंबरपासून उत्तरा, तर २६ पासून हस्त नक्षत्राचा पाऊस सुरू होणार आहे. साधारपणे उत्तरापर्यंत मान्सूनचा जोर असतो; पण यंदा मघा नक्षत्रापासूनच पावसाने उघडीप घेतली. पूर्वा तर भरपावसाचे नक्षत्र; पण एकसारख्या पावसाऐवजी चक्क वादळी पावसाच्या रूपाने पाऊस हजेरी लावत आहे. दिवसभर कडक ऊन पडत आहे. कमालीचा उष्मा असणाऱ्या या उन्हाने होरपळून निघाल्यानंतर दुपारपासून नित्यनेमाने पाऊस हजेरी लावत आहे. रात्री तर ढगफुटीसारख्या पावसाचा अनुभव जिल्ह्याने घेतला आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवलेल्या पर्जन्यानुसार जिल्ह्यात ५४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. करवीरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. उर्वरित तालुक्यात कमी-अधिक पावसाची हजेरी आहे. आगंतुक पाहुण्यासारख्या येणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यात सध्या मळणी सुरू असलेल्या कामात अडथळे येत आहेत. सोयाबीन, मूग, उडदासारखी पिके घरात सुरक्षितपणे आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे.