उन्हाळा घरातच, उष्माघातही पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:58+5:302021-05-21T04:23:58+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कडक होत गेल्याने यावेळचा उन्हाळा बऱ्यापैकी घरातच गेला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून वादळी ...
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कडक होत गेल्याने यावेळचा उन्हाळा बऱ्यापैकी घरातच गेला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून वादळी पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने यावेळी मे महिन्यात कडक उन्हाळा जाणवलाच नाही, याउलट मार्चअखेर ते एप्रिलच्या पंधरवड्यात चाळिशीपार केलेल्या तापमानामुळे कोल्हापूरकर होरपळले. तरीदेखील उष्माघातासारख्या आपत्तीला काेणीही बळी पडले नाही, हे विशेष.
मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सुरुवातीला विकेंड, नंतर वेळ पाळून निर्बंध आणि त्यानंतर आता शंभर टक्के अशा तीन टप्प्यांत जिल्ह्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू आहे. साधारणपणे हा काळ कडक उन्हाळ्याचा असतो. ऊन मी म्हणत असते. उष्णतेची लाट येते; पण नेमके याचवेळी लॉकडाऊन झाल्याने लोक बऱ्यापैकी घरातच राहिल्याने उष्माघात होण्याइतपत तीव्रता जाणवली नाही.
साधारणपणे मे महिन्यात उष्णतेची लाट येते; पण जिल्ह्यात ती मार्चच्या अखेरीस व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच आली. तापमानाचा पारा चाळीसवरून ४१ पर्यंत झेपावले. ही लाट आणखी तीव्र होईल असा इशारा हवामान खात्यानेही दिला होता. तथापि, २० एप्रिलनंतर वादळी पावसाचे वातावरण सुरू झाले. २५ एप्रिलपासून वादळांचा जोर वाढला. आधी अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, त्यानंतर आता तौक्ते चक्रीवादळ यामुळे पावसाने जिल्ह्यात मुक्कामच ठोकला आहे. आठ दिवसांचा कालावधी गृहीत धरला त्यातील पाच दिवस दुपारनंतर हमखास पाऊस पडणारेच ठरले आहेत, तर दोन तीन दिवसच कडक ऊन पडते. त्यातही ढगाळ वातावरण असल्याने त्याची फारशी तीव्रता जाणवत नाही.
चौकट ०१
मार्च, एप्रिलपेक्षा मे महिन्यातील तापमान कमी
जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षांतील सरासरी तापमान पाहिले तर एप्रिलमधील तापमान मे महिन्यापेक्षा जास्त असल्याचे दिसते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ३९, तर मे महिन्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तापमान होते. यावर्षी एप्रिलमध्ये सरासरी ३८ ते ४० आणि एक-दोन दिवशी ४२ वर पोहोचले होते. मे महिन्यातील कमाल तापमान ३५ पर्यंतच राहिले आहे.
चौकट ०२
एकही मृत्यू नाही
उष्माघातामुळे गेल्या तीन वर्षांत एकही बळी गेलेला नाही. यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एका फिरस्त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा होती; पण त्याची नोंद घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे नोंद असल्याने हा अधिकृत मृत्यू धरता येत नाही.