‘एसी’तील साहेब वसुलीसाठी उन्हात
By admin | Published: March 4, 2016 11:28 PM2016-03-04T23:28:32+5:302016-03-04T23:55:52+5:30
‘मार्र्चएंडिंग’ मोहीम : राष्ट्रीयीकृत बँकांतील चित्र
रमेश पाटील-कसबा बावडा ठेवी गोळा करा, नवे खातेदार शोधा, बिझनेस वाढवा, चांगली सेवा द्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एनपीए कमी करा, असा आदेश मार्च एंडिंग जवळ आल्याने काही राष्ट्रीयीकृत बँकांना त्यांच्या व्यवस्थापकांकडून आला आहे. त्यामुळे नेहमी एअरकंडिशन केबिनमध्ये बसणारे शाखाधिकारी आता कर्जवसुलीसाठी उन्हात फिरताना दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जाची थकबाकी विविध कारणांनी वाढत चालली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एनपीए कसा कमी होईल, याकडे ब्रँच मॅनेजरनी जरा जास्तच लक्ष द्यावे, असा तगादा व्यवस्थापनाने लावला आहे. एनपीए कमी झाला नाही तर कारवाईला सामोरे जावावे लागेल, असा ‘इनडायरेक्ट’ इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे ब्रँच मॅनेजर, क्लार्क आणि एखादा शिपाई थकीत कर्जदाराच्या दारात जात असल्याचे सध्याचे चित्र आहे.
३१ मार्च जवळ आला की, बँकांची धांदल उडते ती कर्जाच्या वसुलीसाठी. स्थावर मालमत्तेचा लिलाव करणे, सोने जिन्नसाची विक्री करणे, आदी कामे बहुतेक सर्व प्रकारच्या बँकांत सुरू असतात. मार्च एंडिंगच्या वेळी नवीन खातेदार शोधणे, ठेवी वाढविणे हा हेतू यापूर्वी बँकांचा नसायचा; परंतु अलीकडच्या काही वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज वसुलीबरोबरच ठेवी वाढविणे, नवीन चांगले कर्जदार शोधणे, आदींचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांपेक्षा राष्ट्रीयीकृत बँकांचीच सध्या धावपळ जास्त दिसते आहे.
बँकेचे दैनंदिन कामकाज करत कर्जवसुलीचे, ठेवी वाढविण्याचे व नवीन खातेदार शोधण्याचे जादा काम करावे लागत असल्याने काही कर्मचारी व्यवस्थापनावर नाराज आहेत.
दरम्यान, काही बँकांनी नवीन खातेदार, तसेच ठेवीचे टार्गेट पूर्ण होण्यासाठी ग्राहक सप्ताह, ग्राहक पंधरवडा अशा योजना सुरू केल्या आहेत. त्यात नागरी बँका आघाडीवर आहेत.
काही बँकांत ग्राहकाने ठेव ठेवल्यास त्याला ‘गिफ्ट’ देण्यात येऊ लागले आहे. कोल्हापुरात राष्ट्रीयीकृत बँकांची सुमारे ३०० कोटींहून अधिक रकमेची थकबाकी आहे. याउलट अनेक नागरी बँकांचा एनपीए शून्य टक्के इतका आहे. त्यामुळे कर्जवसुलीसाठी नागरी बँका तुलनेत निवांत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या साहेबांना मात्र उन्हात घाम फुटत आहे.