शिवाजी विद्यापीठाच्या सर्व 'परीक्षा' होणार 'ऑफलाईन एमसीक्यू' पद्धतीने, विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:58 PM2022-06-27T18:58:38+5:302022-06-28T16:17:27+5:30
विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व ६५८ परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नावली) स्वरूपात होणार आहेत. विद्या परिषद या अधिकार मंडळाने मान्यता दिल्यानंतर सोमवारी विद्यापीठाने त्याबाबतचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाले आहे.
विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू स्वरूपात घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला. गेल्या आठवड्यापासून त्यांनी लढ्याची तीव्रता वाढविली. त्यावर विद्यापीठाने गुरुवारी सायंकाळी अभियांत्रिकी, विधि अभ्यासक्रमांची परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू आणि उर्वरित सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन वर्णनात्मक घेण्याचा निर्णय जाहीर केला; पण विद्यार्थी संघटना सर्व परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू स्वरूपात घेण्याच्या मागणीवर ठाम राहिल्या. त्यावर विद्यार्थ्यांची मागणी विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी विद्या परिषदेसमोर ठेवली.
या अधिकार मंडळाने उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू स्वरूपात घेण्यास मान्यता दिली. त्यानुसार परीक्षा होतील. नव्या पद्धतीनुसार परीक्षेची तयारी करण्यास विद्यापीठाला काही कालावधी लागणार आहे. त्याचा विचार करून सुधारित वेळापत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे. महाविद्यालय स्तरावर सुरू असलेल्या पदवी प्रथम वर्ष पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाविद्यालयाच्या नियोजनानुसार सुरू राहणार आहेत.
परीक्षेचे स्वरूप असे
सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने (प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर हजर राहून) ५० गुणांची संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित (प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण २५ प्रश्न प्रत्येकी २ गुण) परीक्षा एक तास कालावधीची एमसीक्यू पद्धतीने होणार आहे. त्यासाठी प्रश्नसंचिक, जादा वेळ, दोन पेपरमधील अंतर आदींची मुभा असणार नाही.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
उन्हाळी सत्रात होणाऱ्या परीक्षा : ६५८
परीक्षार्थींची संख्या : २ लाख
अशी होती विद्यार्थ्यांची मागणी
विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी परीक्षा पद्धतीमध्ये एकसमानता असावी. त्यामुळे अभियांत्रिकी, विधि अभ्यासक्रमांप्रमाणे सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू पद्धतीने घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व विद्यार्थी संघटना कृती समितीने केली होती.
विद्या परिषद या अधिकार मंडळाने दिलेल्या निर्णयानुसार यावर्षी उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू स्वरूपात घेण्यात येणार आहे. त्याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. -डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू