खासगी सावकारांंना समन्स
By admin | Published: March 12, 2016 12:46 AM2016-03-12T00:46:36+5:302016-03-12T00:54:58+5:30
मृत्यू बनाव प्रकरण : सराफांचीही चौकशी; खूनप्रकरणी पवार बंधूंना पोलीस कोठडी
कोल्हापूर : विम्याच्या ३५ कोटी रुपयांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी सेंट्रिंग कामगाराच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या अमोल जयवंत पवार (वय ३१, रा. अपराध कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) व त्याचा भाऊ विनायक (३५) यांना शुक्रवारी आजरा न्यायालयात हजर केले. यावेळी प्रथमवर्ग न्यायाधीश एस. यु. महादार यांनी त्या दोघांना दि. १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, अमोल पवार याने बँका, पतसंस्था, सराफ व सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची स्वतंत्रपणे विशेष पथक चौकशी करत आहे. खासगी सावकारांसह गुजरीतील सराफांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना समन्स बजावले आहे. काही नगरसेवकांनीही पोवार बंधूंना पैसे पुरवल्याची माहिती पुढे येत आहे.
आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारसह जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उकलून या प्रकरणी कटाचा सूत्रधार अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी विम्याच्या ३५ कोटी रुपयांच्या लाभ मिळविण्याच्या उद्देशाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी सेंट्रिंग कामगार रमेश कृष्णाप्पा नाईक (वय १९, रा. गडहिंग्लज, मूळ रा. विजापूर) याचा खून केल्याची कबुली दिली. या दोघा भावांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी आजऱ्याला घेऊन गेले. दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्यांना प्रथमवर्ग न्यायाधीश महादार यांच्या समोर हजर केले. पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी संशयित आरोपींच्या कटाची माहिती देत, या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे. त्यांनी कोणाकडून कर्ज घेतले याचा तपास होण्यासाठी त्यांना चौदा दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायाधीश महादार यांनी नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अमोल पवार याच्या कृपासिंधू डेव्हलपर्सच्या शहरात तीन ठिकाणी साईट सुरू आहेत. त्यासाठी त्याने सुमारे आठ कोटींचे कर्ज काढले आहे. बँका, पतसंस्था व काही खासगी सावकार व सराफांकडून व्याजाने पैशांची उचल केली आहे. पैशांची परतफेड करता न आल्याने त्याच्याकडे बँका, सावकारांनी वसुलीसाठी तगादा लावला होता. रोजच्या त्रासाला कंटाळून त्याने स्वत:च्या नावे ३५ कोटींची विमा पॉलिसी उतरली होती. हा लाभ पदरात पाडण्यासाठी त्याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला. त्याच्या या बनावामध्ये खासगी सावकार, सराफांचा संबंध नसला तरी त्यांच्या त्रासामुळेच त्याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी निष्पाप तरुणाचा बळी घेतला. त्यामुळे संबंधित सावकार, सराफांनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्यावर सावकारकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी तपास पथकाला दिले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक विशेष पथक चौकशी करीत आहे. त्यामध्ये बँका, पतसंस्था, खासगी सावकार व सराफ अशा १३ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. या सर्वांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. किडगाव रोडवरून कामगार नाईक याला उचलले. त्या घटनास्थळी रात्री उशिरा पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी भेट देऊन तेथील काही कामगारांचे जबाब घेतले. (प्रतिनिधी)
घटनास्थळी खुनाचे प्रात्यक्षिक
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दुपारी चारच्या सुमारास संशयित पवार बंधूंना आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक नेऊन कामगाराचा खून कशा पद्धतीने केला त्याचे प्रात्यक्षिक घेतले. यावेळी संशयित अमोल पवार याने कार आय-२० मध्ये पाठीमागे बसलेल्या सेंट्रिंग कामगार रमेश नाईक याचा दोरीने गळा दाबून खून केला. त्यानंतर मी व भाऊ विनायकने त्याला उचलून चालकाच्या सिटवर बसविले. त्यानंतर तेथून कार खड्ड्यात ढकलून दिली. कारचे बॉनेट उघडून त्यावर कॅनमधून आणलेले डिझेल ओतले. कामगार रमेशच्याही अंगावर ओतले. त्यानंतर कारसह त्याला पेटवून दिल्याची माहिती पोलिसांना दिली.
करवीरच्या कोठडीत मुक्काम
हायफाय राहणीमान, डोळ्यावर गॉगल, किमती कपडे, आलिशान गाडी अशा रूबाबात अमोल व विनायक पोवार वावरत असे. दोघांचेही आलिशान बंगले आहेत. अटक केल्यानंतर या दोघांची रवानगी करवीरच्या पोलिस कोठडीत करण्यात आली. शुक्रवारी दिवसभर चौकशी करून रात्री उशिरा कोठडीत पाठविले.
कटाची गोपनियता
पवार बंधूंनी अतिशय थंड डोक्याने कटाचे नियोजन केले होते. या कटामध्ये आणखी काहीजणांना सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिस कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंतच्या तपासामध्ये त्या दोघांच्या भोवतीच तपास फिरत आहे. घरातील आई-वडील, पत्नी हे त्यांच्या कटाबद्दल अनभिज्ञ आहेत तसेच या कटामध्ये मित्रांना सहभागी करून घेतले अन् पुन्हा वर्षभराने त्यांनी कोणाला सांगितले तर आपले पितळ उघडे पडेल, या भीतीपोटी त्यांनी त्यांनाही माहिती किंवा सहभागी करून घेतला नसल्याचा अंदाज पोलिसांचा आहे.
अमोल पवारचा खुनी प्रवास
कोल्हापूर : स्वत:चे अस्तित्व लपविण्यासाठी सेंट्रिंग कामगाराचा खून करून स्वत:च्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक संशयित अमोल जयवंत पवारचा खुनी प्रवास थक्क करणारा आहे. पोलिसांनी सुमारे ३३०० किलोमीटर अंतर पार करून त्याच्या मुसक्या आवळल्या. गेल्या आठ दिवसांतील त्याचा हा खुनी प्रवास.
कडगाव रस्त्यावर रमेशची गाठभेट
गडहिंग्लज-चंदगड रस्त्यावरून जाताना किडगाव येथे क्रशर खडी फोडण्याचा कारखाना आहे. या कारखान्यावर काम करणारे कामगार शेजारीच पाल बांधून राहतात. कारखान्यासमोर रमेश नाईक हा उभा होता. अमोल पवार हा दि. २८ फेब्रुवारी रोजी या मार्गावरून आपल्या आय-२० या कारमधून सावज शोधत जात होता. दुपारी चारच्या सुमारास रस्त्याकडेला उभा असलेला रमेश दिसताच त्याने कार थांबविली. रमेशला चरखुदाईचे काम आहे. अर्ध्या तासात काम उरकेल. तू येणार असशील तर तुला १७०० रुपये देतो, असे सांगितले. दिवसभर ३०० रुपये मजुरीवर काम कारणारा रमेश भारावून गेला. पैशांच्या लालसेपोटी तो कारमध्ये बसला. रात्री हॉटेलमध्ये दारू-मटन दिले. त्याच्यासोबत अमोल व विनायकनेही जेवण केले. आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आले. या ठिकाणी नियोजित प्लॅननुसार आय-२० कारचा अपघात दाखवून रमेशचा गळा आवळून खून केला आणि कारसह त्याला जाळले.
अमोल पवार हा भाऊ विनायक याच्या कारमधून बेळगावला आला. तेथून तो बसने बंगलोरला रवाना झाला; तर भाऊ विनायक कोल्हापूरला आला. पहाटे बंगलोरवर पोहोचल्यानंतर तेथील लॉजवर तो नाव बदलून राहिला. रात्रभर तो झोपला नाही. बंगलोर येथील लॉजवरच त्याने सकाळी नाष्टा व दुपारी जेवणही केले. त्याच्या एटीएमवर पैसे होते; परंतु त्याने शंका येऊ नये म्हणून पैसे काढले नव्हते. जातानाच त्याने वर्षभर कर्नाटकात राहण्याच्या उद्देशाने जवळ पैसे घेतले होते. त्याने दि. २९ रोजी मोबाईलवरून भाऊ विनायकला फोन करून घटनेची विचारपूस केली. त्यानंतर पुन्हा दि. १ मार्चला वृत्तपत्रांत बातमी प्रसिद्ध होताच ‘पोलिस चौकशी करताहेत. तू आत्महत्या केली आहेस, अशी चर्चा आहे. तू फोन करू नकोस. मीच तुला फोन करून सांगत जाईन,’ असे विनायकने त्याला सांगितले; परंतु त्याला चैन पडत नव्हती. तो वारंवार भाऊ विनायकला फोन करून वातावरणाची माहिती घेत होता. (प्रतिनिधी)
पोलिसांचा प्रवास
अमोल जिवंत आहे, याची खात्री पोलिसांना सुरुवातीपासूनच होती. त्यांनी सर्वप्रथम त्याच्या पत्नीकडे चौकशी केली. त्याबाबत ती अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्याचा भाऊ विनायककडे चौकशी केली असता तो विसंगत माहिती देऊ लागला. पोलिसांनी विनायकला दि. १ मार्चला दुपारी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अमोल जिवंत असल्याचे सांगितले . पोलीस बंगलोरला रवाना झाले. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी विनायकला अमोलला फोन लावण्यास सांगितले. फोन लावला असता अमोलने आपण चेन्नईमध्ये असल्याचे सांगितले. तिथे गेल्यावर त्याने पुन्हा आपण कोची-केरळमध्ये असल्याचे सांगितले. पोलिसांनी विनायकला अमोलला विश्वासात घेत तू कोचीमध्येच थांब, तुला पैसे देऊन मी माघारी जाणार आहे, असा निरोप देण्यास सांगितले. हा निरोप देताच अमोल कोचीमध्येच एका लॉजवर थांबून राहिला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
...तर आत्महत्या
केली असती
अमोल पवार याला तो जिवंत असल्याची चाहूल पोलिसांना लागली आहे, हे कळले असते तर त्याने आत्महत्या केली असती. त्यामुळे पोलिसांनी शांत डोक्याने शेवटपर्यंत त्याला चाहूल लागू न देता ताब्यात घेतल्याचे तपास पथकाने सांगितले.