सूर्यकिरणे दुसऱ्यांदा देवीच्या मुखावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 04:28 AM2019-11-13T04:28:11+5:302019-11-13T04:28:23+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाच्या यंदाच्या पर्वात दुसऱ्यांदा मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मुखावर पडली.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाच्या यंदाच्या पर्वात दुसऱ्यांदा मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मुखावर पडली. मंगळवारी सायंकाळी पाच वाजून ४८ मिनिटांनी किरणे देवीच्या मुखावर पडली. किरणोत्सवाच्या पाचव्या दिवशीही पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्याने भाविकांसाठी ही विशेष पर्वणी ठरली.
श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण व दक्षिणायन असे दोन किरणोत्सव सोहळे पार पडतात. दक्षिणायन किरणोत्सवाचा मंगळवारी पाचवा दिवस होता. या पर्वातील किरणोत्सव सोहळ्यात रविवारी पूर्ण क्षमतेने सूर्यकिरणे देवीच्या चेहºयावर पडली होती. त्यानंतर पुढील दोन दिवसांत किरणांचा परतीचा प्रवास सुरू होऊन किरणे कमरेपर्यंत आणि शेवटच्या दिवशी चरणापर्यंत येऊन हा सोहळा संपतो.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटांनी गरुडमंडपात आलेली किरणे पुढचे सगळे टप्पे पार करीत पाच वाजून ४८ मिनिटांनी देवीच्या चेहºयावर आली. अनपेक्षितपणे झालेला हा सोहळा उपस्थित भाविकांसाठी पर्वणीचा ठरला. या वेळी भाविकांनी ‘अंबा माता की जय!’चा गजर केला. पूर्वी किरणोत्सव पाच दिवस साजरा होत होता. मात्र अडथळे आले आणि किरणोत्सव तीन दिवसांचा झाला. गतवर्षी मात्र अभ्यासकांनी मांडलेल्या निष्कर्षानंतर देवस्थान समितीने किरणोत्सव पाच दिवसांचा असेल असे घोषित केले. मंगळवारी अखेरच्या दिवशी पूर्ण क्षमतेने झालेल्या किरणोत्सवाने यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.