सुनंदा चंद्रकुमार नलगे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 09:12 PM2017-09-29T21:12:44+5:302017-09-29T21:12:44+5:30
ग्रामीण लोकसाहित्याच्या रचनाकार सुनंदा चंद्रकुमार नलगे (वय ७८ रा. केर्ली ता.करवीर) यांचे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.
कोल्हापूर - ग्रामीण लोकसाहित्याच्या रचनाकार सुनंदा चंद्रकुमार नलगे (वय ७८ रा. केर्ली ता.करवीर) यांचे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती,एक मुलगा, तीन सुनांसह नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि.२) पंचगंगा स्मशानभूमीत आहे.
नलगे सरांच्या सहजीवनाच्या वाटचालीत त्यांचा मोठा आधार होता. ओवी,नांवे,गौरीगीते,पाळणे अशा लोकसाहित्यातील त्या उत्तम रचनाकार होत्या. लग्नात घ्यायचे नांव त्या सलग दहा-दहा मिनिटे घ्यायच्या. त्यांचे ‘रंग लोकसंस्कृतीचे’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेशी जोडलेले फ.मु.शिंदे, रामदास फुटाणे असे मान्यवर त्यांना आईच मानत होते. रात्री अंत्ययात्रेस निवृत्त जिल्हाधिकारी पी. डी. कांबळे,राम पाटील, शिवशाहीर राजू राऊत यांच्यासह नलगे सरांवर प्रेम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते.