दक्षिणायन किरणोत्सवात अंबाबाईला सूर्यस्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:34 PM2020-11-13T12:34:21+5:302020-11-13T12:36:16+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात गुरुवारच्या मावळतीला अंबाबाईच्या मूर्तीस सूर्यस्नान झाले. सोनसळी किरणांनी सायंकाळी पाच वाजून ४७ व्या मिनिटांनी देवीच्या मुखावर येत तिला अभिषेक घातला. दक्षिणायन किरणोत्सव दोन दिवस उशिरा होत असल्याने आज, शुक्रवारीदेखील पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात गुरुवारच्या मावळतीला अंबाबाईच्या मूर्तीस सूर्यस्नान झाले. सोनसळी किरणांनी सायंकाळी पाच वाजून ४७ व्या मिनिटांनी देवीच्या मुखावर येत तिला अभिषेक घातला. दक्षिणायन किरणोत्सव दोन दिवस उशिरा होत असल्याने आज, शुक्रवारीदेखील पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होण्याची शक्यता आहे.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाचा गुरुवारी पाचवा दिवस होता. हा अखेरचा दिवस असल्याने या दिवशी तरी सूर्यकिरणे देवीच्या चेहऱ्यापर्यंत जाऊन किरणोत्सव पूर्ण होईल, अशी अपेक्षा सार्थ ठरली. सायंकाळी पाच वाजता महाद्वार कमानीतून आलेल्या किरणांनी प्रवासाचा एक-एक टप्पा पार करीत पाच वाजून ४४ व्या मिनिटांनी देवीचा चरणस्पर्श केला. त्यानंतर पुढे सरकत-सरकत पाच वाजून ४७ व्या मिनिटांनी किरणे चेहऱ्यावर आली.
अगदी किरिटापर्यंत जात तब्बल चार मिनिटे किरणे देवीच्या मुखावर स्थिरावली आणि पाच वाजून ५० व्या मिनिटांनी ती लुप्त झाली. यावेळी देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, राहुल जगताप, आदी उपस्थित होते.
गेल्या चार दिवसांच्या तुलनेत किरणांची तीव्रता खूप चांगली होती. शिवाय धुलिकण व धुक्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला. मात्र यंदा देवीच्या नावाचा गजर करण्यासाठी मंदिरात भाविकच नव्हते.
दक्षिणायन दोन दिवस उशिरा
नोव्हेंबर महिन्यात होणारा दक्षिणायन किरणोत्सव हा दोन दिवस उशिराने सुरू होतो; त्यामुळे ९ ते १३ नोव्हेंबर हा किरणोत्सवाचा खरा कालावधी असणार आहे. परिणामी आज, शुक्रवारीदेखील असेच स्वच्छ वातावरण राहिले तर पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होईल, अशी माहिती प्रा. मिलिंद कारंजकर यांनी दिली.