भाजपमध्ये ‘दक्षिण’च्या उमेदवारीवरून सुंदोपसुंदी
By admin | Published: September 14, 2014 12:33 AM2014-09-14T00:33:52+5:302014-09-14T00:35:15+5:30
आरोप-प्रत्यारोप : चंद्रकांतदादांवर टीका
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपच्या कार्यकर्त्यांतच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूझाले आहेत. पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर आज, शनिवारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील, बाबा देसाई व राजाराम शिपुगडे या इच्छुक उमेदवारांनी हल्ला चढविला आहे. तुम्ही वीस वर्षे पक्षासाठी काम केले आणि आम्ही पस्तीस वर्षे काम केले. त्यावेळी आम्हालाही कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही याची आठवण जाधव यांना करून देण्यात आली आहे.
पक्षासाठी मी वीस वर्षे घरदार, कुटुंबाकडे दुर्लक्ष करून काम करीत असून, आम्हाला सोडून इतरांचा उमेदवारीसाठी का विचार केला जात आहे, अशी विचारणा महेश जाधव यांनी गुरुवारी झालेल्या मेळाव्यात आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनाच केली होती. तसे भाजपमध्ये आमदार चंद्रकांतदादा पाटील हेच गेली वर्षभर महेश जाधव यांच्या ‘दक्षिण’मधील उमेदवारीबाबत घोषणा करीत होते. आता त्यांनीच अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी वाढू नये या हेतूने आर. डी. पाटील यांनी हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. आर. डी. पाटील यांनीही शहरात सर्वत्र डिजिटल फलक लावून उमेदवारीची मागणी केली आहे.
त्यात म्हटले आहे की, भाजपमध्ये उमेदवारी देण्याचा अधिकार चंद्रकांतदादांना नाही. ती देण्याची पक्षाची पद्धत ठरलेली आहे. पक्षासाठी उमेदवारी मागितल्यावर मुंबईहून पक्षाचे निरीक्षक येतात. त्यांचा अहवाल निवड समितीमार्फत संसदीय मंडळाकडे पाठविला जातो व तिथे उमेदवारी निश्चित होते. बाहेरून पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले पाहिजे. त्यांना उमेदवारी नाकारण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर नाही. तो पक्ष नेतृत्वाचा अधिकार आहे; परंतु पक्षामध्ये मी एकट्यानेच काम केले आहे व मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचा मेळावा घेऊन पक्षावर दबाव आणणे योग्य नाही.