‘रविवार’ ठरला खरेदीचा वार

By Admin | Published: October 24, 2016 12:44 AM2016-10-24T00:44:00+5:302016-10-24T00:44:00+5:30

दिवाळीच्या तयारीची लगबग : महाद्वार, जोतिबा रोड गर्दीने फुलला

'Sunday' was the buying point | ‘रविवार’ ठरला खरेदीचा वार

‘रविवार’ ठरला खरेदीचा वार

googlenewsNext

कोल्हापूर : दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने आणि बोनसमुळे खिसा गरम झाल्यामुळे नागरिकांनी रविवार हा सुटीचा दिवस धरून खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे रविवार हा ‘शॉपिंग डे’ ठरला.
तयार कपडे, रांगोळी, आकाशकंदिलापर्यंतच्या खरेदीसाठी शहरातील महाद्वार रोड, पापाची तिकटी, जोतिबा रोड, राजारामपुरी, आदी परिसर गर्दीने फुुलून गेला.
दिवाळीची सुरुवात बुधवारी (दि. २६) वसुबारसने होत आहे; तर शुक्रवारी (दि. २८) धनत्रयोदशी आहे. दिवाळीचा मुख्य दिवस शनिवारी (दि. २९) आहे. या दिवशी नरकचतुर्दशी आहे. यंदा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन वेगवेगळ्या दिवशी आले आहे. लक्ष्मीपूजन दर्श अमावास्येला रविवारी (दि. ३०) होणार आहे. पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा सोमवारी (दि. ३१) आहे; तर यमद्वितीया भाऊबीज मंगळवारी दि. १ नोव्हेंबरला होत आहे. अशा या चैतन्य व मांगल्याच्या सणाचे स्वागत साग्रसंगीतपणे व्हावे यासाठी कपडे, साहित्य खरेदीला वेग आला आहे. शहरातील तयार कपड्यांची दुकाने, तयार फराळ स्टॉल, फराळाच्या तयारीसाठी लागणारी साहित्य खरेदी, रांगोळी, पणत्या, उटणे, आकाशकंदील, रंगीबेरंगी विद्युतमाळा, ड्रायफ्रुटस्च्या स्टॉलनी विविध रस्ते फुलले आहेत.
कोल्हापुरातील बहुतांश कंपन्यांनी गेल्या काही दिवसांपासून वेतनासह बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांना दिली आहे. तसेच अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी असल्याने रविवारच्या सुटीची संधी साधत अनेकांनी कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांसह खरेदीला पसंती दिली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून लोकांची बाजारपेठेत गर्दी होऊ लागली. तासागणिक त्यात भर पडत गेली. महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी परिसरातील रस्त्यांवरील कपड्यांचा बाजार फुलला होता. कपिलतीर्थ मार्केट, शिवाजी आणि शिंगोशी मार्केटमध्ये फराळाच्या तयारीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली. बिंदू चौक, शिवाजी चौकासह शाहूपुरी व अन्य परिसरातील तयार फराळाच्या स्टॉलवर गर्दी होती. राजारामपुरी, शाहूपुरी, महाद्वार रोड, लक्ष्मी रोडवरील कपड्यांच्या शोरूम्स, दुकानांमध्ये गर्दी ओसंडून वाहत होती. ‘आकर्षक सवलत’, ‘एकावर एक’, ‘दोनवर दोन मोफत’ अशा योजनांची संधी अनेकांनी साधली. खरेदीनंतर अनेकांनी खासबाग, राजारामपुरी पहिली गल्ली येथील खाऊगल्ली गाठली. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेमध्ये खरेदीची लगबग सुरू होती. खरेदीसाठी अनेकजण दुचाकी व चारचाकी घेऊन बाहेर पडल्यामुळे शहरातील विविध मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते. (प्रतिनिधी)
ताराबाई रोड, पापाची तिकटीला स्टॉल थाटले
महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, पापाची तिकटी या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांनी रांगोळी, पणती, आकाशकंदील, झाडू, सुगंधी उटणे-तेल, अगरबत्ती, फळे, आदींचे स्टॉल थाटले आहेत. मोठ्या आवाजात दर सांगून आपापल्या वस्तू, उत्पादनांच्या विक्रीसाठी त्यांची धांदल सुरू होती. अगदी रांगोळीपासून कपड्यांपर्यंत सर्व काही येथे मिळत असल्याने एकाच वेळी सर्व खरेदी पूर्ण करण्यासाठी नागरिक महाद्वार रोड, ताराबाई रोड, पापाची तिकटी या परिसराला पसंती दिली.

Web Title: 'Sunday' was the buying point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.