रविवार ठरला गणेशोत्सव खरेदीचा वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:00+5:302021-09-06T04:27:00+5:30
कोल्हापूर : अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची चाहूल आता लागली आहे. बाजारपेठेत झेंडूच्या माळा, विद्युत माळा, हार अश्रा सजावटीच्या ...
कोल्हापूर : अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची चाहूल आता लागली आहे. बाजारपेठेत झेंडूच्या माळा, विद्युत माळा, हार अश्रा सजावटीच्या साहित्याची आवक झाली आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने पापाची तिकटी, गंगावेश, महाद्वार रोड आदी परिसरात अशा साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. अनेक जणांनी चार दिवस आधीच गणेशमूर्ती कुटुंबासह येऊन ठरविल्या. त्यामुळे कुंभारवाडेही गर्दीने फुलले आहेत.
श्री गणेशाच्या आगमनासाठीच्या प्राथमिक तयारीला सुरुवात झाली आहे. हरऐक प्रकारच्या सजावटीच्या साहित्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. यात मोतीहार, झेंडू झुंबर, डिस्को फाॅल, झेंडू लटकन, मेटल बाॅल, मेटल चेन, स्टेप बाॅल, कागदी पंखा, मेटल पंखा, चंद्राहार, गौरी सेट, बाजू बंद, मंगळसूत्र, बोरमाळ, किरीट, फ्रूट लड्डी, वेलवेट बाॅल, काचबाॅल, फुल्ल लडी, चुनरी, फुल छत्री, गारलीन, सॅटीनचे पडदे, पानाफुलांच्या लडी या साहित्याची मांडणी करण्यात आली आहे. बाजारगेट, पापाची तिकटी, गंगावेश, महाद्वार रोड परिसरातील दुकानांमध्ये हे साहित्य अडकविण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी बाजारपेठ नव्याने सज्ज होत आहे. नागरिकही खरेदीला हळूहळू येत आहेत. उत्सव जसजसा जवळ येईल तसे बाजारपेठेतील उदासीन वातावरण निवळायला लागले आहे.
गणेशमूर्तींचे आगाऊ आरक्षण
रविवारी सुटीचा वार असल्यामुळे अनेक कुटुंबे गंगावेश, पापाची तिकटी, बापट कॅम्प, शाहूपुरी येथील कुंभार गल्लीत गणेशमूर्ती पाहून त्यांचे आगाऊ आरक्षण करीत होते, तर अनेकांनी आगाऊ रकमा देऊन आपल्या मूर्ती निश्चित केल्या. त्यामुळे या बाजारात गर्दीच गर्दी होती.
प्रतिक्रिया
अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारात हरऐक तर्हेचे सजावटीचे साहित्य बाजारात आले आहे. अगदी २० ते २५०० रुपयांपर्यंतच्या या साहित्याच्या किमती आहेत. जसजसा उत्सव जवळ येईल तसे बाजारात सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
नौशाद मोमीन, (सजावट साहित्य विक्रेते)
प्रतिक्रिया
सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी रविवार असल्यामुळे गर्दी होऊ लागली आहे. जसजसा सण जवळ येईल तसे बाजारात उत्साही वातावरण निर्माण होत आहे.
सागर ब्रह्मपुरे, रुमाल विक्रेता