Maharashtra Election 2019 : रविवार ठरला प्रचाराचा ‘सुपर संडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:14 AM2019-10-14T11:14:39+5:302019-10-14T11:19:13+5:30
सुट्टी असल्याने मतदारांच्या थेट गाठीभेटी, गुप्त बैठका आणि सभांनी रविवार गाजला. सकाळपासून रात्री दहापर्यंत प्रचाराचा नुसता धुरळाच उडाला. शहराच्या ठिकाणी वॉर्डनिहाय बैठकांचे, तर ग्रामीण भागात लहान लहान गावे, वाड्यावस्त्यांवर उमेदवार व त्यांचे नातेवाईक दिवसभर मतदारांच्या संपर्कात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
कोल्हापूर : सुट्टी असल्याने मतदारांच्या थेट गाठीभेटी, गुप्त बैठका आणि सभांनी रविवार गाजला. सकाळपासून रात्री दहापर्यंत प्रचाराचा नुसता धुरळाच उडाला. शहराच्या ठिकाणी वॉर्डनिहाय बैठकांचे, तर ग्रामीण भागात लहान लहान गावे, वाड्यावस्त्यांवर उमेदवार व त्यांचे नातेवाईक दिवसभर मतदारांच्या संपर्कात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
विधानसभेसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होत आहे. तत्पूर्वी दोन रविवार जरी येत असले, तरी २० आॅक्टोबरच्या रविवारी जाहीर प्रचार करता येणार नाही. शनिवारी (दि. १९) सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार संपणार असल्याने १३ आॅक्टोबरचा एकच रविवार मिळणार असल्याने उमेदवारांनी प्रचाराचे नियोजन केले होते. त्यात दुसरा शनिवार असल्याने नोकरदारांना दोन दिवस सुट्टी मिळाली.
परगावी नोकरीनिमित्त असणारे गावाकडे आल्याने त्यांच्या गाठीभेटी घेणे अधिक सोपे झाले. कोल्हापूर शहरात काँग्रेसचे चंद्रकांत जाधव व भाकपचे सतीशचंद्र कांबळे यांनी सकाळपासून प्रचारफेरी व व्यक्तिगत गाठीभेटींवर लक्ष केंद्रित केले. सायंकाळी कोपरा सभांबरोबरच गुप्त बैठका घेऊन प्रचारयंत्रणा गतिमान केली. शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचे दुपारपर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रचारसभेत गेले.
दुपारी चार वाजता फिरंगाई येथे प्रचार रॅली काढली, तर सायंकाळी शाहू बॅँकेसह दोन ठिकाणी सभा घेतल्या. त्याशिवाय वैशाली क्षीरसागर व दिशा क्षीरसागर यांनी महिलांच्या गाठीभेटी व कोपरा सभा घेतल्या, तर ऋतुराज व पुष्कराज क्षीरसागर यांनी युवक व महाविद्यालयीन तरुणांच्या गाठीभेटी घेतल्या.
कोल्हापूर दक्षिणमध्ये कॉँग्रेसचे ऋतुराज पाटील यांनी उपनगर व नंतर ग्रामीण भागात गाठीभेटी घेतल्या. आमदार सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील सदस्यांनी जोरदार संपर्क मोहीम राबविली. रविवारी सुट्टीचा फायदा उठवित उपनगरातील नोकरदारांशी त्यांनी थेट संपर्क केला.
भाजपचे अमल महाडिक हे दुपारपर्यंत अमित शहा यांच्या सभेत होते. त्यानंतर त्यांनी गाठीभेटी व संपर्क दौरे केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, धनंजय महाडिक यांनीही उपनगर व ग्रामीण भागात कोपरा सभा घेतल्या.
गावनिहाय गाठीभेटी, छोट्या छोट्या सभांनी ग्रामीण भागात रविवारी धडाका पाहावयास मिळाला. सर्वच उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती प्रचारात सक्रिय झाल्या. विधानसभेचा प्रचार टीपेला पोहोचला असला तरी, ग्रामीण भागात खरीप काढणीत शेतकरी मग्न आहेत. त्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडून गेल्याने त्याला लवकर शिवारात जावे लागत आहे; त्यामुळे उमेदवारांना सकाळी दहापर्यंत आणि सायंकाळी सहानंतरच मतदारांची गाठभेट होते.
रविवारी दिवसभर उमेदवारांनी सभा, गावभेटी केल्या; पण खरा प्रचार सायंकाळी पाचनंतरच रंगत गेला. जाहीर प्रचारासाठी सहा दिवसच राहिल्याने आज, सोमवारपासून प्रचार वेग घेणार आहे.
जेवणावळींचा धडाका सुरू
मतदानासाठी आठ दिवस राहिल्याने सर्वच मतदारसंघात जेवणावळींचा धडाका लावला आहे. धाबे, हॉटेल फुल्ल होत असून, रात्री साडेदहानंतर हॉटेल सुरू ठेवता येत नसल्याने सात वाजल्यापासूनच जेवणावळीला सुरुवात होत आहे.
‘जोडण्यां’ना वेग
प्रचारसभा, गाठीभेटी वेगावल्या असल्या, तरी अंतिम टप्प्यात फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात उफाळून येणार आहे. अंतर्गत जोडण्या लावण्यात उमेदवारांसह प्रमुख कार्यकर्त्यांची रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू आहेत.