निढोरी पाटबंधारेला रविवारची डेडलाईन

By admin | Published: November 17, 2016 12:04 AM2016-11-17T00:04:13+5:302016-11-17T00:04:13+5:30

शेतकरी आक्रमक : कार्यालये उद्ध्वस्त करण्याचा इशारा

Sunday's deadline for the slaughter-house | निढोरी पाटबंधारेला रविवारची डेडलाईन

निढोरी पाटबंधारेला रविवारची डेडलाईन

Next

दत्तात्रय पाटील--म्हाकवे -शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती आणण्याच्या दृष्टीने शेतीला पाणी मिळणे हा महत्त्वाचा घटक आहे. त्यादृष्टीनेच काळम्मावाडी धरणाची उभारणी आणि कालव्यांचीही खुदाई केली आहे. मात्र सद्य:स्थितीत पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणशून्यतेमुळे म्हाकवेसह सीमाभागातील हजारो शेतकरी पाण्यापासून उपेक्षित आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, रविवार, दि. २० पर्यंत या कालव्यात पाणी न आल्यास निढोरी येथील कार्यालय उद्ध्वस्त करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
पाण्याचे नियोजन करण्यासाठी सर्व यंत्रणेसह अधिकाऱ्यांना गाड्या, कार्यालयांची सोय केली आहे. मात्र म्हाकवेसह सीमाभाग पाण्यापासून नेहमीच वंचित राहात असेल तर ही कार्यालये आणि अधिकाऱ्यांवरील खर्च म्हणजे ‘पांढरा हत्ती’ पोसल्याप्रमाणेच असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत.
२००० ते २०१४ पर्यंत निढोरी कालव्यातून म्हाकवेपर्यंत नियमितपणे पाणी येत होते. तर काही वेळेला सीमाभागातील बेनाडी, हंचनाळच्याही पुढे पाणी नेण्यात आले होते. मात्र गतवर्षी कालव्याच्या डागडुजीअभावी या कालव्याचे पाणी अनेकवेळा म्हाकवेपर्यंतही आले नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे शेकडो एकरातील ऊस पीक वाळून अतोनात आर्थिक नुकसान झाले.
माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी १९९५ मध्ये पाटबंधारे राज्यमंत्री असताना स्वत:च्या जबाबदारीवर निढोरी उजवा आणि बिद्रीकडील डाव्या कालव्यात पाणी सोडून कागल तालुक्यासह सीमाभागातील शेतकऱ्यांना दिलासा दिला. या कालव्यातील पाण्याच्या भरवशावर म्हाकवे, आणुर, गोरंबे, बानगे, हदनाळ, सीमाभागातील हजारो शेतकऱ्यांनी शेकडो एकरांमध्ये उसाचे पीक घेतले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या कालव्याचे पाणी बेभरवशाचे झाले आहे. परिणामी, महागड्या लागवडी, मशागत, मजुरी यावर भरमसाठ खर्च करून लावलेले उसाचे पीक वाळून जात आहे. गतवर्षी धरणात पाणी असल्यामुळे तर यंदा पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे धरणात मुबलक पाणीसाठा होऊनही पिके वाळत आहेत. त्यामुळेच येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


आपत्कालीन परिस्थितीवेळी पाटबंधारेच्या सर्व विभाग प्रमुख व संबंधित कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन त्याचा सामना करणे आवश्यक आहे. मात्र, निढोरी विभागाचे अधिकारी जबाबदारी झटकण्यातच धन्यता मानून वेळ मारतात. रविवारपर्यंत म्हाकवेसह सीमाभागात पाणी न आल्यास येथील अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून कार्यालयांना टाळे लावू. - विजय देवणे,
शिवसेना, जिल्हाप्रमुख
.............


निढोरी कालव्यातून म्हाकवेकडील कालव्यात पाणी सोडले आहे. दुरुस्तीमुळे थोडे कमी दाबानेच पाणी सोडले आहे. सुरुवातीच्या शेतकऱ्यांना उपसाबंदी करून पाणी पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आमच्याकडे कर्मचारी वर्ग कमी असल्याने शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, सर्वच शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
- डी. बी. धारवाडकर, शाखाधिकारी, पाटबंधारे


ठेंबे (पिलर) ही अडथळ्यांच्या शर्यतीतीलच !
शासनाने या कालव्यांना भविष्यात अस्तरीकरण करण्याच्या हेतूने कालव्यामध्ये २० ते २५ फूट अंतरावर काँक्रिटचे पिलर बांधले. या पिलर (ठेंबे) मुळेही पाण्याला अडथळा निर्माण होऊन पाणी पुढे सरकण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
तसेच या ठिकठिकाणी असणाऱ्या पिलरमुळे जेसीबी मशीनच्या साहाय्याने या कालव्यातील केंदाळ, गाळ, माती काढणेही जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे त्वरित कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण करावे, अशी मागणीही शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Sunday's deadline for the slaughter-house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.