संडे हटके बातमी -- हात नसलेल्या हर्षदचा खेळात ‘हातखंडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:31 AM2019-06-23T01:31:55+5:302019-06-23T01:32:55+5:30
कल्पना करा. आपल्याला जन्मत:च हात नसतील तर! हर्षद गोठणकरालाही जन्मत:च हात नाहीत. मात्र, तो हात नाहीत म्हणून रडत बसला नाही. आपले पाय चांगले आहेत ना, असे म्हणत तो आपले
प्रशांत कोडणीकर ।
नृसिंहवाडी : कल्पना करा. आपल्याला जन्मत:च हात नसतील तर! हर्षद गोठणकरालाही जन्मत:च हात नाहीत. मात्र, तो हात नाहीत म्हणून रडत बसला नाही. आपले पाय चांगले आहेत ना, असे म्हणत तो आपले आयुष्य नुसते जगत नाही, तर जगणं आनंददायी कसे करता येईल, ते आपल्या कृतीतून दाखवतोय.
शंकर गोठणकर हे मुंबईतील कुर्ला येथे राहतात. रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १९९६ साली हर्षदचा जन्म झाला; पण या एकुलत्या मुलग्याला हात नव्हते. पण, हर्षद हाताविना सर्व करू लागला. त्याने शालेय शिक्षण कुर्ला येथे, तर सोमय्या कॉलेजमध्ये बी.कॉम. केले आहे. हातपाय धड असलेल्यांना जे जमणार नाही, ते सर्व हर्षदने आपल्या पायाने करून सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले आहे. त्याला खेळाची अत्यंत आवड असून फुटबॉल, कॅरम, पोहणे, आदी सर्व खेळ सामान्य माणसाला लाजवेल असे खेळतो. सुरेख चित्रेही पायानेच काढतो.
त्याने कॅरम आणि फुटबॉल स्पर्धेत बक्षिसेही मिळविली आहेत. त्याच्या जीवनावर युट्यूबवर ‘सोपान : एक जिद्द’ ही लघुफिल्म असून, त्याला २०१५चा ‘झी गौरव’ पुरस्कार मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत त्याचा पायाने खेळलेला व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. तो पाहून येथील
श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने त्याला ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी बोलविले.
नोकरीची गरज
हर्षद प्रत्येक गोष्टीवर मेहनत घेतो. आतापर्यंतच्या प्रवासात त्याला शासनाची कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. तो एकुलता असल्याने यापुढे त्याच्यावर कुटुंंबाची जबाबदारी येणार आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला सरकारी नोकरी मिळण्याची आवश्यकता आहे. त्याला नोकरी देण्याची गरज आहे. याशिवाय सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला तर त्याचे भविष्य उज्ज्वल होईल.