सुंदरनगरची भाकरी पोहोचली तिरुपतीला

By admin | Published: March 17, 2017 11:30 PM2017-03-17T23:30:23+5:302017-03-17T23:30:23+5:30

कऱ्हाडनजीक ‘भाकरीचं गाव’ : महिलांना मिळतोय रोजगार; पन्नास कुटुंबांचा व्यवसाय; यात्रा, कार्यक्रमात पोहोचविल्या जातात भाकरी

Sundrangar's bread has reached Tirupati | सुंदरनगरची भाकरी पोहोचली तिरुपतीला

सुंदरनगरची भाकरी पोहोचली तिरुपतीला

Next



शंकर पोळ ल्ल कोपर्डे हवेली
रोजगार निर्माण करताना तो टिकाऊ आणि लोकांच्या गरजेचा असावा लागतो. तसेच उत्पादीत मालासाठी हमखास मार्केट असावे लागते. मात्र, स्पर्धेमध्ये उतरताना अनेकांना या गोष्टी जमत नाहीत. परिणामी, संबंधित रोजगार बंद होतो. पार्ले, ता. कऱ्हाड येथील सुंदरनगरच्या महिलांनी मात्र घरातच रोजगाराची संधी उपलब्ध केली असून, या महिलांनी तयार केलेल्या भाकरी आता इतर राज्यांतही पोहोचत आहेत.
बनवडीतील काही कुटुंबांचे दहा वर्षांपूर्वी स्थलांतर करून पार्ले हद्दीमध्ये शासनाने त्यांना जागा देऊन पुनर्वसन केले. या कुटुंबांनी या परिसराला ‘सुंदरनगर’ असे नाव दिले. सध्या या सुंदरनगरमध्ये पन्नास कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील लोकांचा रोजंदारी हाच मुख्य व्यवसाय होता; पण अलीकडच्या काळात येथील महिला भाकरी करून देण्याचे काम करू लागल्याने या कुटुंबामध्ये आर्थिक प्रगती झाल्याचे दिसून येते. सुंदरनगरमध्ये तयार झालेल्या भाकरीला सध्या मोठी मागणी आहे. काही महिलांनी विद्यानगर, सैदापूर येथे खाणावळी सुरू केल्या आहेत. तर काही महिला कऱ्हाड तालुक्यात एखाद्या मोठ्या कार्यक्रमात भाकरी करून देण्याचे काम करत आहेत. गावोगावच्या यात्रा, राजकीय कार्मक्रम आदी ठिकाणी भाकरी करून देण्याचे काम या महिला करत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी पवारसह काही महिला घरातच भाकरी तयार करून देत आहेत. या बाजरीच्या भाकरी सहलीसाठी, देवदर्शनाला जाताना लोक घेऊन जात आहेत. शाळूच्या भाकरीपेक्षा बाजरीच्या भाकरीला चांगली मागणी आहे. बाजरीची भाकरी एक महिन्यापर्यंत टिकते. याशिवाय प्रवासातही ही भाकरी आरोग्यदायी ठरते. या भाकरी कागदासारख्या असून, त्या वाळल्यानंतरही चवदार लागतात. भाकरीसोबत लक्ष्मी पवार शेंगदाणा चटणी आणि खर्डा करून देत आहेत. या सर्व गोष्टी टिकाऊ आणि चवीला असल्याने बाहेरगावी फिरायला जाणारे लोक त्यांच्याकडून भाकरी घेऊन जात आहेत. तिरुपती बालाजी, तुळजापूर, कोकण, गुजरात, कर्नाटक आदी ठिकाणी सुंदरनगरच्या भाकरी जाऊ लागल्या आहेत. लक्ष्मी पवार यांची स्वत:ची पिठाची गिरण असून, त्या स्वत: दळण दळून भाकरी तयार करतात. पिठामध्ये चवीपुरते मीठ त्या टाकतात. तसेच तिळाचाही त्या समावेश करतात. गरम पाणी ओतून पीठ मळायचे व चुलीवर भाकरी करायच्या, असा त्यांचा दिनक्रम आहे.
एक किलो बाजरीच्या पिठात तीस भाकरी तयार होतात. तर इतर ठिकाणी भाकरी करण्यासाठी गेल्यास नगावर किंवा हजेरीवर भाकरी करून दिल्या जातात. ओगलेवाडी, मसूर, उंडाळे, बनवडी, कोपर्डे हवेली, पार्ले, नडशी, कऱ्हाड, मलकापूर, शिरवडे, शहापूर, वडोली निळेश्वर आदींसह गावातील लोक येथील भाकरी टिकाऊ आणि चवीला असल्याने घेऊन जात आहेत.
स्वच्छतेला अधिक महत्त्व
बाजरीची भाकरी कागदासारखी पातळ असते. वाळल्यानंतर तिची चव चांगली लागते. खर्डा आणि दही याबरोबर भाकरीला चांगली चव येते. भाकरी चुलीवर भाजल्याने चवीत आणखीनच भर पडते. परिसरासह तालुक्यातील अनेक गावांतील लोक येथून भाकरी घेऊन जातात. सुंदरनगरमधील महिला स्वच्छतेला अधिक प्राधान्य देतात. तसेच भाकरीसाठी येथे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही करावे लागते, हे विशेष.
चवीसोबत आयुर्वेदिक महत्त्वही
बाजरीची भाकरी चुलीवर बनवताना वीटा, दगडाची चूल बनविली जाते. तसेच भाकरी भाजण्यासाठी लिंबाचे जळण वापरले जाते. लिंबाच्या जळणावर तयार केलेल्या स्वयंपाकाला आयुर्वेदात मोठे महत्त्व असल्याचे सांगितले जाते. चवीसाठी आणि आरोग्यासाठीही या भाकरी उपयुक्त आहेत. परिसरातील काहीजण महिलांना भाकरी भाजण्यासाठी स्वत:हून जळण पुरवतात.

Web Title: Sundrangar's bread has reached Tirupati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.