सुनील कदमांवर कोटीचा दावा ठोकणार

By admin | Published: October 25, 2015 01:05 AM2015-10-25T01:05:08+5:302015-10-25T01:07:39+5:30

हसन मुश्रीफ : महादेवराव महाडिकांना राजकीय परिणाम भोगावे लागतील

Sunil Kadam will be claiming Rs | सुनील कदमांवर कोटीचा दावा ठोकणार

सुनील कदमांवर कोटीचा दावा ठोकणार

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या जागा आरक्षण, टीडीआर प्रकरण, पाकीट संस्कृतीत माझा आणि विनय कोरे यांचा कोठेही संबंध नाही. तरीही सुनील कदम ज्याप्रमाणे माझ्यावर आरोप करीत सुटले आहेत, त्यावरून आमदार महादेवराव महाडिक यांची त्यांना फूस असल्याचे दिसून येते. परिणामी महादेवराव महाडिक यांना त्याचे भविष्यातील राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशारा माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, रमणमळा येथील जागा आपण खासगी मालकांकडून विकत घेतली असताना ती जागा हडप केल्याचा खोटा आरोप करणारे ताराराणी आघाडीचे निमंत्रक सुनील कदम यांच्यावर अब्रुनुकसानीचा सुमारे एक कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
कसबा बावडा येथे जाहीर सभेत शुक्रवारी सुनील कदम यांनी, हसन मुश्रीफ यांच्यावर रमणमळा तलावाजवळील ओपन स्पेसची जमीन हडप करून विकसित केल्याचा आरोप केला होता. यावेळी मुश्रीफ यांच्यावर ‘सेटलमेंट मॅन’ अशी टीका केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मुश्रीफ म्हणाले, जागा आरक्षण उठविणे, टीडीआर घोटाळा प्रकरण, पाकीट संस्कृती यांमध्ये मी आणि विनय कोरे यांचा कोठेही संबंध नाही, हे यापूर्वीच आम्ही जाहीर केले आहे. सुनील कदम हे जे बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत, त्याबाबत मी महाडिक यांच्याशी चर्चा करून कदम यांना आवरा असा सल्ला दिला होता; पण महाडिक यांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत, म्हणजे महाडिक यांची कदम यांना फूस असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
माझ्यावर जमीन लाटल्याचा आरोप करण्याअगोदर कदम यांनी त्याची शहानिशा केली असती तर बरे झाले असते; कारण रमणमळा तलावाशेजारील ८६२ चौरस मीटर जागा ही पिवळ्या पट्ट्यातील असून ती आम्ही उदय घोरपडे या खासगी मालकांकडून माझ्या मुलाच्या नावे २००४ मध्ये खरेदी केली आहे. या जागेवर यापूर्वी कोणतेही आरक्षण नव्हते. त्यामुळे सुनील कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे निवडणुकीनंतर मी त्यांच्यावर एक कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘गोकुळ’मधील कामांची चौकशी लावणार
‘गोकुळ’ दूध संघात अनेक विनाटेंडर कामे दिली जातात. ज्याप्रमाणे माझ्या जागेबाबत महाडिक यांनी कदम यांच्यामार्फत एकनाथ खडसे यांच्याकडे कागदपत्रे दिली, त्याचप्रमाणे ‘गोकुळ’मधील विनाटेंडर मंजूर होणाऱ्या कामांची कागदपत्रे मी खडसे यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. त्यांनी त्याबाबत खुशालपणे चौकशी करावी, असेही मुश्रीफ म्हणाले. कदाचित मी खरेदी केलेल्या जागेच्या चौकशीसाठी त्यांनी चौकशी समिती नेमून, त्यावर आमदार महादेवराव महाडिक यांची अध्यक्षपदी नेमणूक करावी, असेही मुश्रीफ मिश्किलपणे म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Sunil Kadam will be claiming Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.