‘स्वीकृत’मधून सुनील कदमांचा पत्ता कट
By admin | Published: January 21, 2016 12:02 AM2016-01-21T00:02:26+5:302016-01-21T00:23:21+5:30
कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा ‘ताराराणी’ला धक्का : स्वीकृत नगरसेवक निवडीत प्रथमच मतदान; प्रस्ताव बहुमताने अमान्य
कोल्हापूर : महानगरपालिकेतील तीव्र सत्तासंघर्षाचे प्रतिबिंब बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी महाडिक कुटुंबीयांचे निकटवर्तीय सुनील महादेव कदम यांच्या उमेदवारीस जोरदार हरकत घेऊन बहुमताने त्यांचा प्रस्ताव अमान्य करत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने ताराराणी आघाडीला पहिला धक्का दिला. सुनील कदम यांचा ३४ विरुद्ध ४३ मतांनी पराभव झाला. यामुळे आक्रमक झालेल्या ताराराणी आघाडी-भाजप नगरसेवकांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबत जोरदार आक्षेप नोंदवत शह देण्याचा प्रयत्न केला, परंतु बहुमताअभावी तो अयशस्वी ठरला. सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी सुरू झालेली ही सभा सायंकाळी पाच वाजता संपली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या.
सत्तासंघर्षामुळे स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदान घ्यावे लागले. तीन तासांचा युक्तिवाद आणि कायद्याचा कीस पाडल्यानंतर चार सदस्यांची निवड ही मतदानाद्वारे घेण्यात आली. त्यामुळे तौफीक मुल्लाणी, मोहन सालपे (कॉँग्रेस), जयंत पाटील (राष्ट्रवादी), किरण नकाते (भाजप) हे बहुमताने विजयी झाले, तर ताराराणी आघाडीचे सुनील कदम बहुमताने पराभूत झाले.
महापालिकेतील पक्षीय संख्याबळाच्या प्रमाणात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी करण्याचा प्रस्ताव आयुक्त पी. शिवशंकर यांनी सभागृहात मांडला. कॉँग्रेसकडून तौफीक मुल्लाणी, मोहन सालपे, राष्ट्रवादी पक्षाकडून प्रा. जयंत पाटील, भाजपकडून किरण नकाते, ताराराणी आघाडीकडून सुनील कदम यांचा या नावांच्या प्रस्तावात समावेश होता, परंतु कॉँग्रेसचे शारंगधर देशमुख व राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी लाटकर यांनी सुनील कदम यांच्या प्रस्तावावर जोरदार हरकत घेतली. तसेच लेखी पत्रही आयुक्तांकडे सादर केले. त्यामुळे अनपेक्षितपणे या निवडीला वेगळे वळण लागले.
सुनील कदम यांच्यावर एक फौजदारी गुन्हा दाखल झाला असून, त्यामध्ये त्यांना कमीत कमी दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्याचा उल्लेख त्यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जात केलेला नाही. तसेच तत्कालीन महापौर तृप्ती माळवी लाच प्रकरणात सुनील कदम यांनी माळवी यांची बाजू घेत महानगरपालिकेची बदनामी होईल, असे वर्तन केले आहे. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव आयुक्तांनी मागे घ्यावा किंवा तो अमान्य करावा, अशी मागणी देशमुख व लाटकर यांनी केली.
कदम यांच्या उमेदवारीवर घेण्यात आलेला आक्षेप परतावून लावण्याचा ‘ताराराणी’च्या रूपाराणी निकम यांनी प्रयत्न केला. कदम यांच्यावर केवळ गुन्हा दाखल झाला आहे, त्यांना त्या गुन्ह्याखाली शिक्षा झालेली नाही. त्यामुळे हा आक्षेप निराधार आहे. माळवी यांच्या कथित भ्रष्टाचाराला सुनील कदम यांनी पाठिंबा दिल्याचा दावाही खोटा आहे. त्यांनी कधीही भ्रष्टाचाराचे समर्थन अथवा माळवी यांना पाठिंबा दिला नाही. कदम यांच्यावरील गुन्हा व माळवी यांचे लाच प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर त्यांचा विचार करता येईल. माळवींचे लाच प्रकरण आणि स्वीकृत नगरसेवक निवड या दोन गोष्टींचा परस्पर कसलाही संबंध नाही, असे स्पष्टीकरण देत, जर तुम्ही कदम यांची निवड रद्द करणार असाल, तर मग सर्वच उमेदवारांच्या निवडी थांबवा, अशी मागणीही रूपाराणी निकम यांनी केली.
लाटकर-देशमुख आणि निकम यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू झाल्याने कायदेशीर मुद्दा तयार झाला. त्यामुळे महापालिकेच्या वकिलांचे म्हणणे घेण्याची सूचना पुढे आली. यावेळी वकील सभागृहात नव्हते. मनपाचे वकील राऊत यांना यायला पाऊण तास लागला. दरम्यानच्या काळात आयुक्त पी. शिवशंकर, नगरसचिव उमेश रणदिवे यांनी खुलासे केले. तरीही दोन्ही बाजूचे नगरसेवक आपल्या मतावर ठाम होते. कदम यांच्या उमेदवारीवर छाननीपूर्वी आक्षेप येणे आवश्यक होते. आता त्यांच्या प्रस्तावावर सभागृहाने निर्णय घ्यावा, असे आयुक्तांनी सांगून टाकले. दरम्यान, लाटकर-निकम यांच्यातील युक्तिवादात मनपा वकील राऊत काही वेळ गोंधळात पडले. शेवटी सभागृहाचा कल, आयुक्तांची सूचना पाहून महापौर रामाणे यांनी पाचही स्वीकृत नगसरसेवक निवडीसाठी मतदान घेण्याचे आदेश दिले.
कदमांचा पराभव;
तिघे बहुमताने विजयी
मतदान प्रक्रि या पार पडल्यानंतर लागलीच निकालही घोषित केला. सुनील कदम यांचा ३४ विरुद्ध ४३ मतांनी पराभव झाला, तर तौफीक मुल्लाणी ४७ विरुद्ध ३२ मतांनी, तर मोहन सालपे ४३ विरुद्ध ३२ मतांनी विजयी झाले. किरण नकाते यांना भाजप-ताराराणी तसेच शिवसेनेचा एक अशी ३३ मते मिळाली. कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. बुधवारी ताराराणी आघाडीच्या तेजस्वीनी इंगवले व कॉँग्रेसच्या रिना कांबळे सभागृहात उपस्थित नव्हत्या.
प्रेक्षक गॅलरी फुल्ल
सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी सुरू झालेली ही सभा सायंकाळी पाच वाजता संपली. सभागृहात झालेल्या युक्तिवादाने सभागृहातील नगरसेवकांची विद्वत्ता चर्चेत आली. महिला नगरसेवकांनीच ही सभा गाजविली. कामकाज पाहण्यासाठी दिवसभर प्रेक्षक गॅलरी फुल्ल होती.
शिवसेनेची नाव भरकटली
सभागृहात शिवसेनेचे नियाज खान, अभिजित चव्हाण, राहुल चव्हाण व प्रतिज्ञा निल्ले असे चार नगरसेवक आहेत, परंतु त्यांच्यात एकी दिसली नाही. त्यांची नाव आज अक्षरश: भरकटली. कॉँग्रेसच्या तौफीक मुल्लाणी यांना चौघांनी मतदान केले, पण नंतर मोहन सालपेंना मतदान न करता तटस्थ राहिले. सुनील कदम यांना राहुल चव्हाण व अभिजित चव्हाण यांनी मतदान केले, तर निल्ले व खान तटस्थ राहिले. पुन्हा प्रा. जयंत पाटील यांच्यावेळी चौघेही तटस्थ राहिले. नंतर किरण नकाते यांना दोघा चव्हाणांनी मतदान केले. शिवसेनेतील बेबनाव सभागृहात स्पष्टपणे दिसून आला. त्यांच्या वर्तनावर वेगळीच चर्चा होत राहिली.
समिती सदस्य निवडी बिनविरोध
‘स्थायी’साठी चढाओढ : शिवसेनेकडून प्रतिज्ञा निल्ले यांचे नाव
कोल्हापूर : बुधवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीसाठी १६ सदस्य, परिवहन समिती समितीसाठी १२ सदस्य, महिला व बाल कल्याण समितीसाठी ९ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व समितीसाठी गटनेत्यांनी आपआपल्या पक्षांच्या सदस्यांची नावे सभागृहामध्ये महापौर अश्विनी रामाणे यांच्याकडे सादर केली. आता या निवडीनंतर या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी खलबते रंगणार आहेत.
शिवसेनेत मात्र स्थायी समितीवर कोणाला पाठवायचे यावरून सभागृहाबाहेरच वाद सुरू होता. आमदार राजेश क्षीरसागर यांनी नियाज खान किंवा राहुल चव्हाण यांच्यापैकी एकाचे नाव द्या, अशी सूचना केली होती, तर शिवसेना भवनमधून प्रतिज्ञा निल्ले यांचे नाव सुचविले होते. त्यामुळे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी नियाज खान यांना सभागृहात जात असताना रोखले आणि सेना भवनचा आदेश दाखविला. त्यामुळे निल्ले यांचे नाव निश्चित करण्यात आले. परिवहन समितीवर सुहास देशपांडे, चंद्रकांत सूर्यवंशी व सयाजी आवळेकर यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती झाली.
स्थायी समिती सदस्य - निलोफर आजगेकर, शोभा बोंद्रे, रिना कांबळे, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम (काँग्रेस ), सत्यजित कदम, नीलेश देसाई, रुपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार (ताराराणी आघाडी), सूरमंजिरी लाटकर, मुरलीधर जाधव, सुनील पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), अजित ठाणेकर, उमा इंगळे, मनीषा कुंभार (भाजप), प्रतिज्ञा निल्ले (शिवसेना).
परिवहन समिती सदस्य - उमा बनछोडे, लाला भोसले, प्रवीण केसरकर, शोभा कवाळे (काँग्रेस), सुनंदा मोहिते, शेखर कुसाळे, सुहास देशपांडे (ताराराणी), सचिन पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी (राष्ट्रवादी), विजयसिंह खाडे-पाटील, सयाजी आळवेकर (भाजप) व नियाज खान (शिवसेना).
महिला व बालकल्याण समिती - वनिता देठे, छाया पोवार, वृषाली कदम (काँग्रेस पक्ष), सरिता मोरे, वहिदा सौदागर (राष्ट्रवादी), अर्चना पागर, कविता माने (ताराराणी आघाडी), सविता भालकर, गीता गुरव (भारतीय जनता पक्ष).
मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच विरोध : कदम
सुनील कदम यांच्या निवडीला आमदार हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरून विरोध झाला आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या जमीन व्यवहारासंबंधी काही महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी जमविली होती. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांत त्यांचा सभागृहातील उपद्रव होऊ नये यासाठी ठरवून त्यांना विरोध केला; परंतु आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा नगरसेवक सत्यजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.