कॅन्सरग्रस्त आईच्या स्वप्नपूर्तीसाठी अंध सुनील बांधणार लग्नगाठ, सुनीलला उच्च शिक्षणाची जिद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 12:20 PM2022-03-22T12:20:10+5:302022-03-22T12:20:39+5:30
३६ वर्षीय सुनीलला उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आहे, मात्र परिस्थितीमुळे घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी केळी आणि नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करतो. आवाज चांगला असल्याने कराओकेवर ऑकेस्ट्रामध्ये गाणीही गातो.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : शेवटच्या घटका मोजत असलेल्या कॅन्सरग्रस्त आईने अंध मुलाचे डोळ्यादेखत लग्न व्हावे अशी व्यक्त केलेल्या इच्छापूर्तीसाठी कसबा बावडा येथील सुनील यल्लाप्पा दोडमणी आज, मंगळवारी गोरज मुहूर्तावर शंभर टक्के अंध असलेल्या कौशल्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
शुगरमिल येथील दगडी चाळीत राहणारा सुनील हा शंभर टक्के अंध आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच शिक्षण घेत बीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या ३६ वर्षीय सुनीलला उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आहे, मात्र परिस्थितीमुळे घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी केळी आणि नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करतो. आवाज चांगला असल्याने कराओकेवर ऑकेस्ट्रामध्ये गाणीही गातो. मात्र, त्याची शिक्षणाची ऊर्मी काही कमी झालेली नाही. याही परिस्थितीत तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. वडील यल्लाप्पा सुरक्षा रक्षक असले तरी वेळप्रसंगी वाहनचालक म्हणूनही काम करतात.
सुनीलची ५६ वर्षीय आई बाळाबाई यांना दीड महिन्यापूर्वी कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्याची माहिती झाली. परिस्थितीमुळे वेळेत या जीवघेण्या आजाराची माहिती न मिळाल्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. शेवटचा श्वास घेण्यापूर्वी मुलाचे लग्न झालेले पहायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान सामाजिक शास्त्रात एमए पूर्ण केलेल्या सोलापूरच्या ३२ वर्षीय अंध असलेल्या कौशल्या साठेची त्याची ओळख झाली होती. तिने काही दिवसांपूर्वी सुनीलच्या आईच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केला होता.
कौशल्याचा स्वभाव आवडल्याने बाळाबाईंनी माझ्या सोनूशी लग्न करशील का असे थेटच विचारले. कौशल्याचे वडील अभिमन्यू साठे हे शेती करतात. त्यांच्याशी बोलणी झाल्यानंतर सोमवारीच या लग्नाला मान्यता मिळाली. लगेचच त्यांचा विवाह ठरवण्यात आला. त्यानुसार दोघेजण आज, मंगळवारी सायंकाळी ४ वाजून ४७ मिनिटांनी शुगरमिल येथील सतेज मल्टिपर्पज हॉलमध्ये विवाहबद्ध होत आहेत.
सुनीलच्या आईची तब्येत अतिशय नाजूक असल्याने त्यांच्यावर सध्या त्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात अंतिम उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी खात्री दिलेली नसल्यामुळे आणि सून पाहण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुनील, त्याच्या बहिणी सीमा आणि उमा, त्यांचे पती निवृत्ती आणि संदीप तसेच त्याचा मित्रपरिवार, आणि कुटुंबीय धडपडत आहेत.
हाताने लिहिल्या पत्रिका
आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातलगांना हाताने लिहिलेल्या पत्रिका त्यांनी वाटल्या आहेत. त्यांच्या या अनोख्या धडपडीला परिसरातील व्यक्ती सलाम करीत आहेत.