‘सुपरमून’ चे घडले दर्शन- खगोलप्रेमी, कोल्हापूरकरांनी साधली संधी; पृथ्वीपासून ३ लाख ५६ हजार किलोमीटरवर चंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:44 PM2018-01-01T22:44:03+5:302018-01-01T22:45:03+5:30
कोल्हापूर : नववर्षाच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरकर आणि खगोलप्रेमींनी सोमवारी ‘सुपरमून’चे दर्शन घेतले.
कोल्हापूर : नववर्षाच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरकर आणि खगोलप्रेमींनी सोमवारी ‘सुपरमून’चे दर्शन घेतले. नेहमीपेक्षा यावर्षी चंद्र हा १४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसला.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी पौष पौर्णिमा सुरू झाली. सायंकाळी साडेपाच वाजता चंद्रबिंब उगविले. ते चंद्रबिंब सायंकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी पूर्ण दिसू लागले. यावर्षी चंद्र हा नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा आणि ३० टक्के जास्त तेजस्वी दिसला. त्याचा मॅग्नीट्यूड (दृश्यप्रत) हा माईनस १२.४५ इतका होती.
पौर्णिमेच्या दिवशी जर पृथ्वीच्या जवळ आला, तर त्याला ‘सुपरमून’ म्हटले जाते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर दूर असतो. ‘सुपरमून’वेळी पौर्णिमेचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा सुमारे चौदा टक्के मोठे आणि सोळा टक्के जास्त तेजस्वी दिसते. सन १९७९ मध्ये रिचर्ड नोले यांनी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीजवळ आलेल्या चंद्रास सर्वप्रथम ‘सुपरमून’ असे नाव दिले. सोमवारी चंद्र हा पृथ्वीपासून ३ लाख ५६ हजार किलोमीटर आला. त्यामुळे सुपरमूनचे दर्शन घडले, अशी माहिती खगोलशास्त्रज्ज्ञ डॉ. अवीराज जत्राटकर यांनी दिली. दरम्यान, कोल्हापूरकर आणि खगोलप्रेमींनी साध्या डोळ्यांनी सुपरमूनचे दर्शन घेतले. खगोल अभ्यासक, छायाचित्रकारांनी हा सुपरमून कॅमेराबद्ध केला.
नववर्षाला घडले ‘सुपरमून’चे दर्शन : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी ‘सुपरमून’ दिसला. या ‘सुपरमून’ला ‘लोकमत’चे छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ यांनी कॅमेराबद्ध केले.