प्रचाराचा आज ‘सुपर संडे’

By Admin | Published: October 25, 2015 12:47 AM2015-10-25T00:47:43+5:302015-10-25T01:09:53+5:30

महापालिका निवडणूक : रंगत भरली, शहर दणाणले; पुढच्या पाच दिवसांत तोफा धडाडणार

'Super Sunday' campaign today | प्रचाराचा आज ‘सुपर संडे’

प्रचाराचा आज ‘सुपर संडे’

googlenewsNext

 कोल्हापूर : विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आरोपांच्या फैरी झडायला लागल्यामुळे महानगरपालिका निवडणुकीतील रंगत वाढू लागली आहे. निवडणूक प्रचारात शहराचा विकास, कोल्हापूरचा ‘स्मार्ट सिटी’तील समावेश, महापालिकेतील भ्रष्टाचार या स्थानिक मुद्द्यांबरोबरच देशातील आणि राज्यातील भाजप सरकारचा कारभार, दलितांवरील हल्ले, वाढत चाललेली महागाई, आदी मुद्दे चर्चेचे ठरले आहेत. विशेषत: तूरडाळीच्या दरवाढीचीही हलगी वाजविली जाऊ लागली आहे. आज निवडणूकपूर्व शेवटचा रविवार असल्याने शहरात सर्वत्र प्रचाराची जोरदार तयारी झाली असून, शिवसेनेने आयोजित केलेला आदित्य ठाकरे यांचा रोड शो विशेष आकर्षण ठरणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या रविवारी (१ नोव्हेंबर) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आज, रविवारपासून पुढे पाच दिवस प्रचाराची ही रणधुमाळी आणखी जोर घेणार आहे. पुढच्या पाच दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माणमंत्री रवींद्र वायकर, भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गृहराज्यमंत्री राम शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही तोफा धडाडणार आहेत.
दसरा झाला आणि शुक्रवार (दि. २३)पासून प्रचाराची रंगत कमालीची वाढली. उमेदवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते प्रभागाचा कोपरान्कोपरा पिंजून काढत आहेत. मतदारांना साद घालत आहेत. लाऊड स्पीकर लावून प्रचार करणारी वाहने तर एकेका मिनिटाला गल्ली, कॉलनीत पोहोचत आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण प्रचाराच्या गदारोळात न्हाऊन गेले आहे.
प्रचारात पुरुषांबरोबरीने महिलाही मोठ्या संख्येत उतरल्या आहेत. विशेषत: सायंकाळी प्रचाराच्या पदयात्रा सुरू होऊन त्या रात्रीपर्यंत प्रभागात दिसत आहेत. उमेदवार तर पायांना भिंगरी बांधल्यासारखे पळत आहेत.
गेल्या दोन दिवसांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तोफा डागून प्रचारात रंगत भरली. चव्हाण यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले, तर खडसे यांनी कॉँग्रेसच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. या दोन नेत्यांच्या सभांनी प्रचारात आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. भाजपने युती केली नसल्याने शिवसेना नेत्यांचा राग अनावर झाल्याचे दिसत आहे. सेना नेते आक्रमकपणे प्रचारात उतरले आहेत.
आदित्य ठाकरे यांचा रोड शो
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आज, रविवारी कोल्हापुरात येत असून दुपारी चार वाजता ताराराणी चौक येथून त्यांचा रोड शो होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते दुपारी साडेतीन वाजता दिगंबर जैन बोर्डिंग येथे होणार आहे. त्यांची रॅली बापट कॅम्प, कदमवाडी, सदर बझार, पितळी गणपती, रमणमळा, सीपीआर रुग्णालय, सिद्धार्थनगर, जुना बुधवार पेठ, नष्टे गल्ली, बुरुड गल्ली, पिवळा वाडा कॉर्नर, तेली गल्ली, जोशी गल्ली, पापाची तिकटी, गंगावेश, उत्तरेश्वर, दुधाळी, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, रंकाळवेश तालीम, तटाकडील तालीम, निवृत्ती चौक, उभा मारुती, जुना वाशीनाका, देवकर पाणंद, संभाजीनगर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, दिलबहार तालीम, गोखले कॉलेज, पांजरपोळ, राजारामपुरी, सायबर चौक मार्गे व्हीनस कॉर्नर येथे विसर्जित होईल. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या रोड शोमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून, हा रोड शो यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक झटत आहेत. प्रचाराची रंगत वाढेल तसे शिवसेनेचे जिल्ह्यातील सहाही आमदार प्रचारात उतरले आहेत.
अशोक चव्हाण आज कोल्हापुरात
कॉँग्रेस पक्षाची आज, रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रायव्हेट हायस्कू ल मैदानावर जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, चंद्रकांत हंडोरे, सतेज पाटील, पी. एन. पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: 'Super Sunday' campaign today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.