कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची उचलबांगडी, येरवडा येथे बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 11:25 AM2020-12-25T11:25:08+5:302020-12-25T11:34:34+5:30
Jail Crimenews Kolhapur- कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने दखल घेत आज, शुक्रवारी कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची येरवडा कारागृहात बदली करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने दखल घेत आज, शुक्रवारी कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची येरवडा कारागृहात बदली करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
कळंबा कारागृहात सापडलेल्या गांजा, मोबाईल आदी वस्तूंबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली असून अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद हे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. काल सकाळी जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहात जाऊन याप्रकरणाची चौकशी केली होती.
सोमवारी मध्यरात्री चारचाकी वाहनातून आलेल्या दोन तरुणांनी तीन गठ्ठे कारागृहातील संरक्षण भिंतीवरून आत फेकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळले. हे गठ्ठे मंगळवारी पहाटे कारागृहातील सुरक्षा रक्षकास मिळाले. गठ्ठ्यामध्ये पाऊण किलो गांजा, नवे दहा मोबाईल संच, पेनड्राईव्ह, मोबाईल कॉड आदी साहित्य सापडले होते. कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदल्याने खळबळ उडाली होती. याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेत चौकशी सुरू झाली आहे.
चौकशीसाठी आलेल्या अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी आज, शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात कळंबा कारागृहाला भेट देऊन चौकशी सुरु केली आहे. त्यांनी सर्वप्रथम कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तातडीने उचलबांगडी करत त्यांना येरवडा कारागृहाचा पदभार दिला आहे. त्यांच्या जागी येरवडा येथील इंदुरकर यांची प्रभारी अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
अधीक्षक शेळके हे आठवडाभर घरगुती कामानिमीत्त रजेवर होते. गांजा, मोबाईल कारागृहात सापडल्यानंतर शेळके यांना अप्पर पोलीस महासंचालक रामानंद यांनी बोलवून घेतल्याने ते रजेवरुन थेट पुण्याकडे रवाना झाले. रामानंद यांनी शेळके यांच्याकडे घडल्या प्रकाराबाबत चौकशी केली होती.
२०१९ मध्ये निलंबनाची कारवाई
यापूर्वीही शेळके यांना वाई येथील सीरियल किलर डॉ. संतोष पोळ याने कळंबा कारागृहात पिस्तूल घेऊन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणात निलंबित करण्यात आले होते.परंतु १२ मे २०१९ मध्ये शेळके यांच्यासह पंधरा जणांना चौकशी समितीने क्लीन चिट दिली होती. त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही मागे घेण्यात आली होती. या प्रकरणात शेळके यांची विसापूर कारागृहात बदली करण्यात आली होती.