चुकीबद्दल कारकुनाची अधीक्षकांकडून कानउघडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:20+5:302021-05-27T04:27:20+5:30
कोल्हापूर : चोरीतील जप्त दागिने मूळ मालकाला देण्याऐवजी दुसऱ्याच गुन्ह्यातील अर्जदारास दिल्याचे चौकशी अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे तत्कालीन कारकुनाला ...
कोल्हापूर : चोरीतील जप्त दागिने मूळ मालकाला देण्याऐवजी दुसऱ्याच गुन्ह्यातील अर्जदारास दिल्याचे चौकशी अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे तत्कालीन कारकुनाला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी चौकशीसाठी बोलवून चुकीबद्दल कानउघडणी केली. ‘त्या’ कारकूनाने त्याच्या जबाबदारीवर पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया राबवून दागिने जमा करून मूळ मालकास परत देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
न्यायालयाने आदेश देऊनही चोरीतील जप्त केलेले ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने मुळ मालकास परत दिले नव्हते. दागिने परत मिळावेत यासाठी मूळ मालक सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोकराव येणेचवंडीकर हे बसर्गे (ता. गडहिंग्लज) ते कोल्हापुरात करवीर पोलीस ठाणे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले अडीच वर्षे फेऱ्या मारत होते. या प्रकरणावर लोकमतने प्रकाशझोत टाकल्यानंतर चौकशी सुरू झाली. याप्रकरणी करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी चौकशी करुन तो अहवाल पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्याकडे दिला. ‘ते’ जप्त केलेले दागिने मुळ मालकाला देण्याऐवजी दुसर्याच घरफोडी प्रकरणातील अर्जदारास दिल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त नसतानाही संबधीत कारकुनाने मुद्देमाल जप्तचा खोटा अहवाल न्यायालयात सादर करून दिशाभूल केल्याचे निदर्शनास आले. तसेच चोरीचे जप्त केलेले दागिने घरफोडीच्या गुन्ह्यात दाखवल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले.
त्यानुसार पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी तत्कालीन कारकुनास चौकशीसाठी बोलवून त्यांची कानउघडणी करत कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात पुन्हा स्वत:च्या जबाबदारीवर न्यायालयीन प्रक्रिया राबवून संबंधित दागिने परत मिळवून मूळ मालकाला देण्याचेे आदेश दिले.