राज्यातील सत्ता नव्या अध्यक्षासाठी पूरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 01:12 AM2019-11-25T01:12:14+5:302019-11-25T01:12:21+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या इच्छुकांचे सर्व लक्ष सध्या मुंबईच्या घडामोडींकडे आहे. तेथे येणारी सत्ता ही या अध्यक्षपदासाठी पाठबळ देण्यासाठी पूरक ठरणार असल्याने, सर्वपक्षीय इच्छुक सध्या दूरचित्रवाहिनी, मोबाईल तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमांतून तेथील माहिती घेण्यात गुंतले आहेत.
कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या इच्छुकांचे सर्व लक्ष सध्या मुंबईच्या घडामोडींकडे आहे. तेथे येणारी सत्ता ही या अध्यक्षपदासाठी पाठबळ देण्यासाठी पूरक ठरणार असल्याने, सर्वपक्षीय इच्छुक सध्या दूरचित्रवाहिनी, मोबाईल तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमांतून तेथील माहिती घेण्यात गुंतले आहेत.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची वाढीव मुदत २१ जानेवारीला संपणार आहे. नवा अध्यक्ष ‘इतर मागासवर्गीय’ राहणार असल्याचे आरक्षणातून स्पष्टही झाले आहे; त्यामुळे ‘इतर मागासवर्गीय’ दाखला असलेले अनेक इच्छुक सत्ता कुणाची येणार याची औत्सुक्यपूर्ण चौकशी करताना दिसत आहेत.
सध्या शौमिका महाडिक या अध्यक्षा असल्या तरी लोकसभा निवडणुकीनंतर काही पावले माघारी आलेला भाजप विधानसभेनंतर तर हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील दोन्ही आमदार पराभूत झाल्याने आणि अशात राज्यात सरकार बनत नाही, असेच शनिवार (दि. २३)पर्यंतचे चित्र असल्याने भाजपला ही निवडणूक जड जाणार असल्याचे चित्र होते.
तुलनेत विधानसभेला कॉँगे्रस, राष्ट्रवादी यांनी दहापैकी सहा जागा जिंकल्याने आघाडी जोमात आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि त्यांना उघड पाठबळ देणारे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यामुळे जिल्हा परिषदेत दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेना मिळून बाजी मारतील, असे चित्र निर्माण झाले होते.
परंतु शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर हे सरकार टिकले, तर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा भाजपचा अध्यक्ष करणे सोपे जाईल, अशी भाजप नेत्यांची अटकळ आहे. सध्या भाजपकडून अरुण इंगवले हे या पदाचे प्रमुख दावेदार आहेत.
त्यांचे अनेक मित्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येही आहेत; परंतु जर राज्यात दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेना असे सरकार बनले तर ते इंगवले यांच्यासाठी जड जाणार आहे. परंतु भाजप अजित पवार यांच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाल्यास इंगवले यांच्यासाठी ते सकारात्मक असेल.