जयंत पाटील पूरबातमीसाठी पूरक बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:46+5:302021-08-24T04:27:46+5:30
महापुराचा परिणाम पाहता कोल्हापूरची हद्दवाढ हाच एकमेव पर्याय असल्याचे मत यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ते ...
महापुराचा परिणाम पाहता कोल्हापूरची हद्दवाढ हाच एकमेव पर्याय असल्याचे मत यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कोल्हापूर महापालिका सक्षमपणे चालण्यासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. प्राधिकरण तयार केले आहे. मात्र, त्याला काही अधिकार नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी घातलेले भराव ही आता एक समस्या झाली आहे. आर्किटेक्चरनीच त्याचे उत्तर शोधावे. पुलाचे बांधकाम कमानींचे असावे की कसे असावे याचाही फेरविचार करायची गरज आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नद्यांमधील गाळ आणि वाळू न काढण्याबाबत काढलेला आदेश रद्द करण्याची गरज आहे. नद्या उथळ झाल्या आहेत. नदी, नाल्यांची पात्रे रुंद आणि खोल करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील शहरांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे तेथेही नियोजन करण्याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.
धाडसी निर्णयाचा फायदा झाला
सतेज पाटील
२०१९ च्या पुराच्यावेळी जिल्ह्यातील प्रशासनाची काय तयारी होती या वादात मी जाणार नाही; परंतु यावेळी आम्ही जे नियोजन केले, त्याला यश आले. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक धरणे रिकामी करण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांचेही मी आभार मानतो; परंतु यामुळे पुराची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. २००५ च्या पुरात पुरातील गावांतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रस्ते नव्हते. त्यासाठी आम्ही रस्ते केले आणि याच रस्त्यांच्या भरावामुळे पूरस्थिती वाढण्यास मदत झाली. त्यामुळे नव्याने उपाययोजना कराव्या लागतील. भराव्या ठिकाणचे रस्ते उचलून घ्यायचे, रस्त्यातून डक्टमधून पाणी काढायचं अशी पंचगंगेच्या ६७ किलोमीटरच्या प्रवासात सगळीकडेच दक्षता घ्यावी लागणार आहे. म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ओढे, नाले रुंद करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
आपण कमी पडलोय ही वस्तुस्थिती
आमदार चंद्रकांत जाधव
शहर विकासामध्ये आपण सर्वजण कमी पडलोय हे मान्य करूया. जिथं शक्यताही नाही तिथं पूर आल्यामुळे फेरविचाराची गरज आहे. त्यामुळे यापुढे पाणलोट क्षेत्रात बांधकाम करणे टाळायला हवे. महापालिका, अधिकारी, बिल्डर या साऱ्यांनाच कामाची दिशा बदलावी लागेल. आपल्याकडे आधी घर आणि नंतर ड्रेनेजलाईन टाकली जाते. त्याच्या उलट झाले पाहिजे. आयुष्याच्या कमाईतून घर घेतलेल्यांना नाहक त्रास होऊ नये याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे.
पिलर पूल उभारावे लागतील
अजय कोराणे
या महापुराच्या आधीच आम्ही असोसिएशनच्यावतीने निवेदन दिले होते. पर्जन्यवृष्टीतील बदल, ढगफुटी, अतिक्रमणे, वाढती बांधकामे या सर्व बाबींचा विचार करण्याची गरज आम्ही निवेदनातून व्यक्त केली होती. पावसाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा अधिक विकसित करावी लागेल. शिरोली महामार्ग, कसबा बावडा रोड, शिवाजी पुलाच्या पुढील रेडेडोह रस्ता या ठिकाणी पाण्याचा निचरा करणारे पिलरवरील पूल उभारण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी न थांबता पुढे जाईल अशी बांधकाम रचना या ठिकाणी आवश्यक आहे. येणाऱ्या तिसऱ्या विकास आराखड्यामध्ये ६६ किलोमीटरच्या क्षेत्रात सध्या ६९ टक्के क्षेत्र विकसित आहे. उर्वरित ठिकाणी मात्र नव्या नियमांची अंमलबजावणी व्हावी, तसेच कोल्हापूरच्या हद्दवाढीशिवाय दुसरा कोणताही उपाय आता दिसत आहे.