जिल्ह्याला आणखी ६१ हजार कोविशिल्ड लसींचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:29+5:302021-07-11T04:17:29+5:30
कोल्हापूर: अजून मागणीच्या तुलनेत ५० टक्के देखील पुरवठा होत नसलातरी देखील लसीचे डोस येण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहेत. ...
कोल्हापूर: अजून मागणीच्या तुलनेत ५० टक्के देखील पुरवठा होत नसलातरी देखील लसीचे डोस येण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहेत. शनिवारी कोविशिल्डचे ६१ हजार ७५० डोस उपलब्ध झाले, त्याचे लागलीच वितरणही करण्यात आल्याने सोमवारपासून लसीकरण वेगावणार आहे.
जिल्ह्याला दर आठवड्याला ३ लाख लसींची आवश्यकता असते. लस नियंत्रण केंद्राकडून दर आठवड्याला तशी मागणी नोंदवली जाते, सातत्याने पाठपुरावा केला जातो, पण मागणीच्या तुलनेत निम्मी देखील लस येत नाही. लस टोचून घेण्यासाठी नागरिक तासन्तास रांगेत उभे राहतात असताना मागणीच्या तुलनेत लसच येत नसल्याने केंद्रावर वादावादीचे प्रसंग वाढले आहेत. रेशनप्रमाणे लोक भल्या पहाटेपासून रांगा लावत आहेत, पण सर्वांना लस मिळत नसल्याने सध्या जिल्हाभर गोंधळाची परिस्थिती आहे. लस उपलब्ध नसल्याने शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी तर लसीकरण पूर्णपणे थांबवण्यात आले आहे.
दरम्यान, शनिवारी पुण्याहून ६१ हजार ७५० लस जिल्हा केंद्राकडे उपलब्ध झाल्या. याच आठवड्यात गेल्या मंगळवारी ६२ हजार लसींचा पुरवठा झाला होता. म्हणजे या आठवडाभरात १ लाख २३ हजारांवर लस उपलब्ध झाली. मंगळवारी आलेली लस संपल्याने शनिवार, रविवार लसीकरण थांबवण्यात आले. आलेल्या ६१ हजार लसींपैकी १४०० लसी दिव्यांग व परदेेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
प्रतिक्रिया
सध्या प्राधान्याने दुसरा डोस असलेल्यांनाच लस दिली जात आहे. कोविशिल्डचेच जास्त लसीकरण असल्याने दुसऱ्या डोससाठी त्याचा वापर सुरु आहे तर अल्प प्रमाणात येणारी कोव्हॅक्सिन लस ही पहिला डोस घेणाऱ्यांना दिली जात आहे.
डॉ. फारुक देसाई,
लस समन्वयक अधिकारी
चौकट
अजून १९ लाख लोक लसीकरणाच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यात ३४ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत १५ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून त्यांचे प्रमाण एकूण लसीकरणाच्या अवघे ११ टक्के आहे. अजूनही १९ लाख नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.
चौकट
तालुकानिहाय उपलब्ध लस
हातकणंगले ११, ४००
करवीर ६५७०
शिरोळ ६०२०
कागल ४३९०
गडहिंग्लज ४३००
पन्हाळा ३८२०
राधानगरी ३७००
चंदगड ३६४०
शाहूवाडी ३४१०
भूदरगड ३०००
आजरा २४२०
गगनबावडा ६९०
रुग्णालयनिहाय लस वितरण
महापालिका - ६०९०
सेवा रुग्णालय कसबा बावडा - ५००
सीपीआर - ४००