कोल्हापुरातील सीपीआरला बनावट परवान्याने औषध पुरवठा, कच्च्या बिलांवर कोट्यवधी रुपये अदा केल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 12:14 PM2024-02-01T12:14:40+5:302024-02-01T12:15:41+5:30

सीपीआर प्रशासन मात्र गप्पच  

Supply of drugs under fake license to CPR Hospital in Kolhapur | कोल्हापुरातील सीपीआरला बनावट परवान्याने औषध पुरवठा, कच्च्या बिलांवर कोट्यवधी रुपये अदा केल्याची तक्रार

कोल्हापुरातील सीपीआरला बनावट परवान्याने औषध पुरवठा, कच्च्या बिलांवर कोट्यवधी रुपये अदा केल्याची तक्रार

शिवाजी सावंत

गारगोटी : कोल्हापुरातील सीपीआरमधील औषध खरेदीच्या निविदाप्रक्रियेत अजिंक्य अनिल पाटील याने शरद पांडुरंग वैराट (रा. दोघेही नाधवडे, ता. भुदरगड) यांच्या लायसन्सचा आधार घेऊन बनावट दस्तावेज वापरून अधिकाऱ्यांशी संगनमताने कोट्यवधी रुपयांच्या ठेका मिळवल्याचे उघड झाले आहे. कच्च्या बिलांवर कोट्यवधी रुपये अदा केल्याचे पुढे आले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते जयराज कोळी यांनी केली आहे. शौर्य मेडिकलचा परवाना असताना तो खोडून तिथे ‘न्यूटन इंटरप्रायजेस’ असे लिहिले व सगळा व्यवहार केल्याचे उघड झाले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अश्विन ठाकरे यांनी २५ फेब्रुवारी २०२२ला दिलेला हा मूळ परवाना असून, त्याची मुदत २१ फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. या परवान्यात फक्त नावच तेवढे बदल आहे, असे असताना कुणाचे तरी पाठबळ असल्याशिवाय त्याला औषध पुरवठ्याचा ठेका मिळण्याची शक्यता नाही. शरद वैराट यांचे हेदवडे या (ता. भुदरगड) येथे शौर्य मेडिकल नावाचे औषध दुकान आहे. त्यांच्या या दुकानात अजिंक्य पाटील हा काही वर्षांपूर्वी आला होता.

गावातीलच व्यक्ती असल्याने वैराट यांनी त्यांना दुकानात बसायला खुर्ची दिली. या संधीचा फायदा घेऊन त्याने त्यांच्या दुकानात लावलेल्या परवान्याचा फोटो मोबाइलवर काढला आणि वैराट यांना आपण कोल्हापूर येथे मेडिकल दुकान काढणार असल्याचे सांगितले. त्यांनी या घटनेकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही; पण गेल्या महिन्यात माहितीचा अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी सीपीआरमधील औषध खरेदीचा घोटाळा उघड केला.

त्यावरून वैराट यांनी कोळी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना समजले की आपल्या परवान्याचा वापर करून न्यूटन इंटरप्रायजेस या नावाने अजिंक्य पाटील याने शासनाला कोट्यवधी रुपयांचा औषध पुरवठा केला आहे. त्यांनी तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली.

अजिंक्य पाटील याने वैराट यांच्या शासकीय परवान्याचा फोटो वापरून त्यातील फक्त वरचे नाव काढून टाकून त्या ठिकाणी ‘न्यूटन इंटरप्रायजेस’ हे नाव लिहिले. या बनावट परवान्याची प्रत वापरून सीपीआरमधील औषध खरेदीचा ठेका मिळविला. या परवान्याची कोणतीही खातरजमा, कागदपत्रांची छाननी न करता त्यांना ठेका दिला गेला. परवान्यावर असलेल्या फोटोतील व्यक्ती वेगळी आहे आणि ठेका मिळविण्यासाठी निविदा देणारी व्यक्ती वेगळी आहे याचीपण शंका अधिकाऱ्यांना का आली नाही यामध्ये संगनमत झाल्याचा संशय आहे.

सीपीआरच्या सर्जिकल स्टोअरमध्ये आलेले साहित्य कंपनीसोबत झालेल्या करारातील ब्रॅण्डचे नसून ते अन्य वेगवेगळ्या कंपनीचे आहे. तरीही सीपीआरच्या स्टोअर विभागाने साहित्य स्वीकारले हा कराराचा भंग आहे. या निविदाप्रक्रियेतील खरेदी केलेले साहित्य व औषधे बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. दराची तफावत असूनही औषधे व साहित्याची खरेदी झाली. संबंधित ठेकेदाराने कच्चे बिले दिली तरीही सीपीआरने बिल अदा केल्याचे कागदपत्रांवरून दिसते, असे कोळी यांचे म्हणणे आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ

‘सीपीआर’च्या प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

कायदेशीर कारवाई न केल्यास आमरण उपोषण करणार आहे. याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, खासदार यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे. - शरद वैराट, नाधवडे (ता.भुदरगड)
 

बनावट दाखला वापरून औषध पुरवठा केलेल्या कंपनीची चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी चार जणांची समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये दोन डॉक्टर व दोन आस्थापनांशी संबंधित लोक आहेत. त्यांनी आठवड्यात अहवाल देण्याची सूचना केली आहे. ही मूळ निविदा ९ कोटी ४६ लाखांची आहे. शासनाच्याच जीईएम पोर्टलवर त्यांनी निविदा भरली आहे. त्यामुळे सीपीआर प्रशासनाने त्याची चौकशी करण्याचा प्रश्न आला नाही. बनावट परवान्याची तक्रार असली तरी त्यांनी पुरवठा केलेल्या औषधात मात्र कोणतीही बनावटगिरी नाही. - डॉ.प्रकाश गुरव, अधिष्ठाता, राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.

Web Title: Supply of drugs under fake license to CPR Hospital in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.