जिल्ह्यातील ३५० वेश्या महिलांना मदतीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:09+5:302021-03-04T04:44:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना काळात रोजगार नसल्याने अडचणीत सापडलेल्या वेश्या महिला व त्यांच्या मुलांच्यासाठी राज्य शासनाने जाहीर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना काळात रोजगार नसल्याने अडचणीत सापडलेल्या वेश्या महिला व त्यांच्या मुलांच्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेली मदत कोल्हापूर व इचलकरंजीतील ३४८ महिलांना व ३५ बालकांना मिळाली आहे. महिलांना दरमहा पाच हजार रुपये व बालकांना अडीच हजार रुपये दिले जातात. शिवाय रेशनही मोफत दिले जाते.
आंतरराष्ट्रीय वेश्या हक्क दिन बुधवारी (दि.३) होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संग्राम संस्थेच्या प्रकल्प समन्वयक अमृता सुतार, नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्सच्या अध्यक्ष किरण देशमुख व इचलकरंजीतील वेश्या एड्स मुकाबला परिषदेचे समीर शेख यांनी ही माहिती दिली. अडचणीच्या काळात राज्य सरकारने ही मदत दिल्याबद्दल या महिलांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी ही मदत खूपच मोलाची आहे. अशी आपत्कालीन मदत गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणेही गरजेचे असते. व ज्या लोकांसाठी ही योजना आहे, त्यांचे प्रतिनिधी जिल्ह्याच्या समितीवर असणे गरजेचे आहे. या दोन्ही बाबतीत बरेच प्रश्न तयार झाले आहेत. जिल्ह्यास्तरीय समित्यामध्ये या महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही. अजूनही अनेक महिलांचे बँकेत खाते नाही. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यामुळेही अडचणी येत आहेत. अजूनही ज्यांची यादी पाठविली त्या सर्व महिलांना पैसे व धान्यही मिळालेले नाही. पुढील याद्याही मागविलेल्या नाहीत. तरी या योजनेपासून वंचित असलेल्या महिलांना तातडीने मदत दिली जावी.