‘खंडपीठा’ला ८५ संघटनांचा पाठिंबा
By admin | Published: April 10, 2017 12:47 AM2017-04-10T00:47:06+5:302017-04-10T00:47:06+5:30
बैठकीत निर्णय; राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंचची स्थापना; एकोपा राखण्याचा निर्धार
कोल्हापूर : कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, या मागणीसाठीच्या लढ्याला जिल्ह्यातील विविध धर्मीय, समाज अशा ८५ संघटनांनी रविवारी पाठिंबा दिला. विविध समाजातील एकोपा कायम राखण्यासह कोल्हापूरचा हा सामाजिक आदर्श देशभर पोहोचविण्यासाठी ‘राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंंच’ची स्थापना करण्यात आली.
येथील मुस्लिम बोर्डिंगच्या सभागृहात ‘सामाजिक सलोखा मंच’तर्फे विविध धर्मीय, समाज संघटनांची बैठक झाली. यात प्रारंभी बैठकीचे अध्यक्ष पापाभाई बागवान यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मल्हार सेनेचे बबन रानगे यांनी ‘सामाजिक सलोखा मंच’ची स्थापना आणि खंडपीठासाठी सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी बैठक आयोजित केली असल्याचे प्रास्ताविकातून स्पष्ट केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष व मंचचे कार्यवाह वसंतराव मुळीक यांनी खंडपीठ हा कोल्हापूरचा ज्वलंत प्रश्न आहे. या ठिकाणी खंडपीठ होण्यासाठी आपण आग्रही राहूया, असे आवाहन केले. शिवाय कोल्हापूरची सामाजिक एकजूट, एकोपा कायम राखणे, तो वाढविण्यासाठी सर्व समाज-संघटनांची शिखर संस्था असणाऱ्या ‘राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंच’ची स्थापना करण्याचा मुद्दा मांडला. त्याला विविध धर्मीय, समाज संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी हात उंचावून आणि ‘कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे,’ या घोषणेद्वारे निर्धार व्यक्त करीत पाठिंबा दिला. यानंतर कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे म्हणाले, खंडपीठासाठी गेल्या ३२ वर्षांपासून सहा जिल्हे आणि ६३ तालुक्यांतील वकिलांनी लढा दिला आहे. यावर्षी आम्ही हा लढा लोकाभिमुख करण्यासाठी ‘नागरी कृती समिती’ची स्थापना केली. आमच्या लढ्याला विविध ८५ धर्मीय, समाज संघटनांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे बळ मिळाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाला पत्र देण्याची दिलेली ग्वाही हा आपला एका टप्प्यावरील विजय आहे. अंतिम यश मिळेपर्यंत आपण सर्वांचे पाठबळ कायम राहावे. बैठकीस बाळासो भोसले, अॅड. विवेक घाटगे, किशोर घाटगे, कादर मलबारी, शामू मुधोळ, शिरीष देशपांडे, फिरोज उस्ताद, शंकर शेळके, दिलीप भुर्के, श्रीपाल जर्दे, सुरेश रोटे, राजकुमार चौगुले, हिदायत मुल्ला, एन. एन. पाटील, राकेश निल्ले, जी. एस. पाटील, जयवंत पलंगे, संजय आवळे, सुनीता लोहार, ऊर्मिला सुतार, हेमलता कोळी, आनंद साळोखे, शरद साळुुंखे, अवधूत पाटील, विजयकुमार शेट्टी, जगमोहन भुर्के, अनिल गिरी, अरुण कुराडे, बाबूराव बोडके, अशोक घाडगे, गोरखनाथ गवळी, राघू हजारे, अनिल कांबळे, महादेव जाधव, भाऊसो काळे, बाजीराव गायकवाड, आनंद म्हाळुंगेकर, काशिनाथ रानगे, सतीश कुंभार, अशोक माळी, आदी उपस्थित होते. उमेश पोर्लेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
--------------------
कोण, काय, म्हणाले...
* राजशेखर तंबाखे : कोल्हापुरात खंडपीठ आणण्यासाठी जोर लावूया.
* प्राचार्य श्रीधर हेरवाडे : एखाद्याचे मन दुखावणे म्हणजे हिंसा आहे. ‘खरे ते माझे’ असा आग्रह माणसांनी धरावा.
* संजय शेटे : मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरबाबत दिलेला शब्द पाळावा.
* एम. एम. कुरेशी : खंडपीठासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देऊया.
* वसंतराव मुळीक : ‘सलोखा मंच’च्या माध्यमातून दर तीन महिन्यांतून बैठक घेऊन विविध समाजातील प्रश्न आणि चांगल्या गोष्टींवर चर्चा केली जाईल.
* गणी आजरेकर : खंडपीठाबाबतचे आंदोलन हे जनतेचे आहे. एन. डी. पाटील सरांची समजूत काढून लढा यशस्वी करूया.
* कादर मलबारी : या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी प्रा. एन. डी. पाटील सर यांना पुन्हा साकडे घालूया.
* उत्तम कांबळे : खंडपीठासाठी संघटितपणे लढा देऊया.
*आशा कुकडे : महिला विषयक कायद्यांची अंमलबजावणी व्हावी.
या संघटनांचा पाठिंबा
अखिल भारतीय मराठा महासंघ, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, परीट, खाटीक, गवळी, ओतारी, कुंभार, घिसाडी समाज, कंजारभाट, सोनार समाज, जिल्हा सर्वोदय मंडळ, धनगर समाज महासंघ, स्वातंत्र्यसैनिक संघटना, ख्रिस्ती युवा शक्ती, सुतार-लोहार समाज बहुउद्देशीय संस्था, कोळी समाज युवा मंच, सिटीझन फोरम, कोल्हापूर ओबीसी बारा बलुतेदार संघ, जैन बोर्डिंग, दक्षिण भारत जैन सभा, महाराष्ट्र अल्प ख्रिस्ती विकास परिषद संस्था, सुन्नत मुस्लिम जमात लीग, माजी सैनिक महासंघ, मल्हारसेना, जनलोक पार्टी, दसनाम गोसावी, माळी समाज, मुस्लिम पंचायत, ओतारी समाज, आदींनी बैठकीतील निर्णयाला एकमताने पाठिंबा दिला.