बेळगाव शहरात ‘भारत बंद’ला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:47+5:302020-12-09T04:18:47+5:30
बेळगाव शहरात ‘भारत बंद’ला पाठिंबा मिळत असून शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी जे तीन कायदे सरकार अंमलात ...
बेळगाव शहरात ‘भारत बंद’ला पाठिंबा मिळत असून शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी जे तीन कायदे सरकार अंमलात आणणार आहे. त्याच्या विरोधात नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगावात देखील ‘बंद’ पुकारण्यात आला आहे.
आपल्या आंदोलनासाठी बेळगाव शहर परिसर व जिल्ह्यातील शेतकरी मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाच्या ठिकाणी दाखल झाले होते. या शेतकऱ्यांनी बसस्थानकाच्या गेटवर टायर जाळून आंदोलनाला सुरुवात केली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वी चहा बनवत होते, त्यामुळे त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी चक्क गेटवर भररस्त्यात चहाला उकळी देऊन चहा बनविला. मात्र, या प्रकाराला पोलिसांनी आक्षेप घेऊन चहाचे भांडे जप्त केले. बसस्थानकाच्या गेटवरील हे ठिय्या आंदोलन सकाळी उशिरापर्यंत सुरू होते. परिणामी परिवहन मंडळाची बस सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शहर, उपनगरांसह परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. बसगाड्या सुरू नसल्यामुळे बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावर शेकडो प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनामुळे भारत बंदचा प्रभाव जाणवत होता.
फोटो : बेळगाव बसस्थानक गेटवर चहा उकळी आंदोलन करताना शेतकरी.