मालवाहतूक संघटनेच्या देशव्यापी ‘चक्का जाम’ला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 05:36 PM2017-10-09T17:36:12+5:302017-10-09T17:39:57+5:30
वस्तू आणि सेवाकराच्या (जीएसटी) जाचक अटी, डिझेलचे वाढलेले दर, प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार आदींविरोधात आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसतर्फे सोमवारपासून पुकारलेल्या देशव्यापी मालवाहतूक ‘चक्का जाम’ला कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्यावतीनेपाठिंबा जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली.
कोल्हापूर : वस्तू आणि सेवाकराच्या (जीएसटी) जाचक अटी, डिझेलचे वाढलेले दर, प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार आदींविरोधात आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसतर्फे सोमवारपासून पुकारलेल्या देशव्यापी मालवाहतूक ‘चक्का जाम’ला कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली.
‘जीएसटी’मुळे वाहतूक क्षेत्रात झालेल्या बदल व भारतात डिझेल दर एकच असावेत. यासह टोल केवळ नॅशनल परमिट असलेल्या वाहनांवर लावावी. त्यातून इंधन व वेळ वाचेल. राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये बसविण्यात आलेली संगणक प्रणालीला लागणारी इंटरनेट कनेक्टिव्हिटी होत नाही.
यासह पुरेसे मोटार वाहन निरीक्षक संबंधित कार्यालयात नाहीत. त्यामुळे मालवाहतूकदारांना वारंवार या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. त्यात श्रम, वेळ आणि पैसाही जातो. त्यात पासिंग होत नाही. त्याचा भुर्दंड वाहनधारकांना सहन करावा लागतो. याकरीता रोज ५० रुपये इतका दंड आकारला आहे. हा दंड रद्द करावा.
जुनी वाहने विकतानाही जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दुहेरी कर आकारला जात आहे. ई-मार्ग विधेयक आणि प्रस्तावित ई-वे बिल हे परिवहन क्षेत्रासाठी अनुकुल नाही. अशा एक ना अनेक प्रश्नांबाबत यापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. तरीही याबाबत कोणत्याही प्रकारचे सकारात्मक पाऊल सरकारने उचललेले नाही.
या ‘चक्का जाम’ला कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी उपाध्यक्ष भाऊ घोगळे, प्रकाश केसरकर, हेमंत डिसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.