विकासकामांना आश्वासनांचे पाठबळ, अर्थसंकल्पातून कोल्हापूरला वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 01:45 PM2020-03-07T13:45:53+5:302020-03-07T13:48:12+5:30
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कोल्हापूर शहरातील विकासकामांकरिता स्पष्टपणे तरतूद केली नसली तरी आश्वासनाचे पाठबळ मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. कोल्हापूरच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्याकरिता १६ मार्चला मंत्रालयात सर्व आमदारांची बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये विकासकामांच्या निधीबाबत निर्णय होणार आहे.
कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कोल्हापूर शहरातील विकासकामांकरिता स्पष्टपणे तरतूद केली नसली तरी आश्वासनाचे पाठबळ मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. कोल्हापूरच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्याकरिता १६ मार्चला मंत्रालयात सर्व आमदारांची बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये विकासकामांच्या निधीबाबत निर्णय होणार आहे.
शुक्रवारी राज्य सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केला. अर्थसंकल्पात कोल्हापूरसाठी काय असणार याबाबत उत्सुकता होती; परंतु शहरातील विकास कामांकरिता थेट अशी तरतूूद करण्यात आलेली नसली तरी आश्वासने मात्र देण्यात आली आहेत. राज्याच्या बजेटमधील वेगवेगळ्या हेडखाली निधी दिला जाणार आहे.
अंबाबाई मंदिर परिसर विकासकामाला यापूर्वी ८० कोटींपैकी सात कोटींचा निधी मिळाला असून काम सुरू झाले. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी या वर्षी देण्यात येईल. शहरातील रस्त्यांचा १७८ कोटींचा प्रकल्प सादर केला असून, त्यातील १०० कोटींचा निधी पहिल्यांदा देण्याचे मान्य झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यात ७८ कोटी दिले जाणार आहेत. राज्याच्या नगरोत्थान योजनेतून हा निधी उपलब्ध केला जाईल. शाहू स्मारक, माणगाव परिषद शतकमहोत्सव, पर्यटन याकरिताही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. १६ मार्च रोजी मंत्रालयात बैठक होणार असून, त्यामध्ये याबाबतची घोषणा केली जाईल, असे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.