भगव्याची ॲलर्जी असणाऱ्यांना पाठबळ, हे कसले हिंदुत्व?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 11:52 AM2022-04-11T11:52:56+5:302022-04-11T11:59:39+5:30
ज्यांनी भगव्याचे नाव घेतले पाहिजे ते आता भगव्याची ॲलर्जी असणाऱ्यांच्या पाठीशी लागले आहेत. म्हणून भगव्याचे रक्षण करण्याकरिता आम्ही मैदानात उतरलो आहोत.
कोल्हापूर : ज्यांना हिंदू समाजाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याची ॲलर्जी आहे त्यांना पाठबळ देणे हे कसले हिंदुत्व, अशी विचारणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात केली. तुम्हाला जर मशिदीवरील भोंगे चालत असतील तर मग हनुमान चालीसा म्हटली तर राग का येतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
फडणवीस यांनी ‘कोल्हापूर उत्तर’च्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शनिवारी जाहीर सभा घेतली. रविवारी पत्रकार परिषद घेतली व त्यामध्ये हिंदुत्वावर भर दिला. ते म्हणाले, ज्यांनी भगव्याचे नाव घेतले पाहिजे ते आता भगव्याची ॲलर्जी असणाऱ्यांच्या पाठीशी लागले आहेत. म्हणून भगव्याचे रक्षण करण्याकरिता आम्ही मैदानात उतरलो आहोत. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, ज्यांनी विचारणा केली की क्या राम यहां पैदा हुअे थे इसका क्या सबूत है, यांच्याविरोधातील ही लढाई आहे.
रामसेतूला विरोध करणारे, रामही काल्पनिक थे और सेतू भी काल्पनिक था, असे म्हणणाऱ्यांशी ही लढाई आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा दिल्यानंतरही नरेंद्र मोदी नावाच्या वाघाने हे कलम रद्द केले. पण कुणाच्या बापाची विरोध करण्याची हिंमत झाली नाही. रक्ताचे पाट राहू दे, पण आता काश्मीरमध्ये तिरंगा लहरतोय हे आहे हिंदुत्व.
शिवछत्रपतींच्या या भूमीत आल्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक भलेमोठे होर्डिंग दिसायचे. ते पाहून मला ऊर्जा मिळत होती. परंतु आज तिथे ठाकरे यांच्याशेजारी सोनियाजींचा फोटो व पंजा चिन्ह पाहिल्यावर हिंदुत्वाचे नामोनिशाण मिटल्याचे दिसून आले. भगव्याचे रक्षण करण्यासाठी भाजप मैदानात आहे. ही लढाई व्यक्तीची नाही तर विचारांची आहे. या सर्वाचा काश्मीर फाइल्सलाही विरोध आहे. कारण यामध्ये त्यावेळचे सत्य मांडलंय असेही ते म्हणाले.
सनातन हिंदू धर्म की जय
जाहीर सभेचा समारोप करताना फडणवीस यांनी मुठी आवळून सनातन हिंदू धर्म की जय, रामभक्त हनुमान की जय... सियावर रामचंद्र की जय.. बजरंग बली की जय.. अशा घोषणा दिल्या.