‘दौलत’च्या कामगारांना कुपेकरांचा पाठिंबा
By admin | Published: March 3, 2015 12:16 AM2015-03-03T00:16:09+5:302015-03-03T00:27:04+5:30
आंदोलन सुरूच : राजीनाम्यासाठी संचालकांना शनिवारपर्यंत मुदत, तहसीलदारांना निवेदन
चंदगड : दौलत साखर कारखाना सुरू करावा व शेतकऱ्यांसह कामगारांचे थकीत पैसे द्यावेत, या मागणीसाठी दौलत बचाव संघर्ष समितीच्यावतीने सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला सोमवारी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पाठिंबा दिला.
दरम्यान, संचालक मंडळाने दौलत सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले याचा खुलासा करावा यासाठी संचालक, कामगार व कृती समितीच्या सदस्यांची बैठक बोलवावी या मागणीचे निवेदन प्रा. एन. एस. पाटील, अॅड. संतोष मळवीकर, डॉ. बी. एल. पाटील, अर्जुन कुंभार यासह आंदोलकांनी तहसीलदारांना दिले.दौलत कारखाना गेली चार वर्षे बंद आहे. तो सुरू करावा या मागणीसाठी आंदोलन कृती समितीतर्फे डिसेंबर २०१४ मध्ये आंदोलन सुरू केले होते. पण, व्यवस्थापनाने दौलत सुरू करायला आलेल्या पार्टीला पैसे उभे करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा, अशी मागणी केल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, चौथा गळीत हंगाम संपला तरी कारखाना सुरू करण्यासंबंधी संचालक मंडळाने कोणतीच हालचाल केली नाही. त्यामुळे दौलत कामगार संघटना, सिटू कामगार संघटना व जनआंदोलन कृती समितीच्यावतीने संयुक्त आंदोलन सुरू केले आहे. रविवारी कारखाना स्थळावर शेतकरी कामगार यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बुधवारी संचालक मंडळासोबत तहसील कार्यालयात बैठक घ्यावी, त्या बैठकीत गोपाळराव पाटील व संचालक मंडळ हजर राहिले नाहीतर त्यांचा राजीनामा घेणे, केंद्रीय कृषिमंत्री, सचिव, सहकारमंत्री यांना भेटण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून सोमवारी तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी आमदार कुपेकर यांनी ९ मार्चला सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात ‘दौलत’संबंधी आपण आवाज उठवू, असे सांगून न्यायालयीन वादात अडकलेल्या २७ कोटी रुपये शेतकरी व कामगारांना देण्यासंदर्भात आपण प्रयत्न करू असे सांगितले, तर प्रा. एन. एस. पाटील यांनी दौलतचा लढा निर्णायक वळणावर आला आहे. त्यामुळे कामगार व शेतकरी यांनी आता मागे न राहता आंदोलनात सक्रीय व्हावे, असे आवाहन केले. अॅड. मळवीकर यांनी आता ‘आर या पार’ची लढाई केली पाहिजे. संचालक मंडळाचे राजीनामे तर घेऊच, पण त्यांच्यावर कर्जाची जबाबदारी निश्चित करण्याची जबाबदारी सभासद, कामगारांची असल्याचे सांगितले.
आंदोलनात प्रभाकर खांडेकर, दिवाकर पाटील, महादेव गावडे, सुरेश हरेर, सुरेश सावंत-भोसले, सुरेश भातकांडे, महादेव फाटक, अशोक चांदेकर, संजय देसाई, नामदेव कुट्रे, प्रदीप पवार, अर्जुन कुंभार, केन, अकौंंट, सुरक्षा, वर्कशॉप विभागातील कर्मचारी या सहभागी झाले होते.