एलबीटी काढणाऱ्या पक्षाला पाठिंबा
By Admin | Published: July 23, 2014 12:27 AM2014-07-23T00:27:31+5:302014-07-23T00:31:51+5:30
‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’(फाम)
कोल्हापूर : जाचक स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी काढणाऱ्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा राहील, असा निर्णय आज, मंगळवारी मुंबईत ‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’(फाम) मध्ये घेण्यात आला.
दरम्यान, दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘फाम’चे पदाधिकारी व राज्यातील २१ महापालिकेच्या व्यापारी प्रतिनिधींनी ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास निश्चितच एलबीटी काढू, असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिल्याची माहिती कोल्हापूर उद्योजक व व्यापारी महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगावकर यांनी दिली.
राज्यातील सत्ताधारी काँॅग्रेस आघाडी सरकारला वित्त विभागाने एलबीटी कायम ठेवावा, असा अहवाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांच्या ‘फाम’या शिखर संघटनेची आज, सायंकाळी बैठक झाली. तत्पूर्वी, दुपारी व्यापाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी व्यापाऱ्यांनी, विक्रीकर विभागाच्या महाराष्ट्र इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कौन्सिल (एमईडीसी)चा अहवाल विक्रीकर विभागाचे माजी सचिव सुबोधकुमार, दिलीप दीक्षित यांनी तयार केला आहे. या अहवालावर आयुक्त, सचिव व व्यापारी या तिघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. या अहवालाच्या मसुद्यावर महायुती निश्चितच निर्णय घेऊन राज्यात महायुतीचे सरकार आले, तर एलबीटी रद्द करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना दिले.
दरम्यान, ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ‘फाम’च्या कार्यालयात बैठक झाली. जो पक्ष एलबीटी रद्द करेल, त्या पक्षाच्या बाजूने विधानसभा निवडणुकीत राहायचा निर्णय झाला. बैठकीत विक्रीकर विभागाच्या एमईडीसीच्या अहवालाबाबत चर्चा झाली. बैठकीस राज्यातील २१ महापालिकेतील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
‘फाम’च्या बैठकीत निर्णय
‘फाम’च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची मुंबईत भेट