कोल्हापूरकरांनी अनुभवले मानव निर्मित उपग्रहाचे अधिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:07 PM2019-03-07T13:07:38+5:302019-03-07T13:11:14+5:30
अधिक्रमण हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच असते. ते होत असताना सूर्याच्या बिंबावरून एक ठिपका सरकत गेल्यासारखे दिसते. असेच एक मानवनिर्मित उपग्रहाचे 'अधिक्रमण' अवकाशात पहावयास तर मिळालेच, शिवाय कोल्हापूरच्या खगोलप्रेमींना राधानगरीजवळ या अधिक्रमणाचे चित्रिकरण करण्यासही यश मिळाले.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : अधिक्रमण हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच असते. ते होत असताना सूर्याच्या बिंबावरून एक ठिपका सरकत गेल्यासारखे दिसते. असेच एक मानवनिर्मित उपग्रहाचे 'अधिक्रमण' अवकाशात पहावयास तर मिळालेच, शिवाय कोल्हापूरच्या खगोलप्रेमींना राधानगरीजवळ या अधिक्रमणाचे चित्रिकरण करण्यासही यश मिळाले.
कोल्हापूर आणि परिसरातून पृथ्वीभोवती भ्रमण करणारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (ISS- Intarnational Space Statuon) गेले काही दिवस सूर्योदयापूर्वी तसेच सूर्यास्तानंतर उघड्या डोळ्यांनी आकाशात दिसत होते. हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पहाणे हाही खगोलप्रेमींचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय असतो. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सुरु असलेली ही अविस्मरणीय घटना कॅमेऱ्यामध्येही चित्रबद्ध करण्यासाठी कोल्हापूरातील 'कुतूहल फाउंडेशन', आणि 'गगनवेधी' या संस्थेचे खगोलप्रेमी उत्सुक होते.
दिनांक ४ मार्च रोजी दुपारी ११ वाजून ४५ मिनिटे व ५७ सेकंदांनी हे अवकाश स्थानक (ISS) 0.६ सेकंद इतक्या अल्प वेळात सुर्यासमोरून मार्गक्रमित होणार होते. दिवसाच्या उजेडामुळे फक्त सूर्यावरून मार्गक्रमित होताना हे स्थानक दिसू शकणार होते.
हा वेळ अत्यंत अल्प असल्याने तसेच सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नसल्याने खगोलप्रेमींच्या समोर आव्हान होते. परंतु टेलीस्कोपच्या सहाय्याने विशिष्ट फिल्टर लावून मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये ही घटना चित्रबद्ध करण्यात यश आले. या उपक्रमात अनिकेत कामत, प्रफुल कांबळे, अथर्व देव, संग्राम देशपांडे, चिन्मय जोशी, सौरभ धवन आणि आनंद आगळगांवकर हे खगोलप्रेमी सहभागी झाले होते.
चित्रीकरण करण्यात खगोलप्रेमींना मिळाले यश
टेलीस्कोपच्या सहाय्याने विशिष्ट फिल्टर लावून मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये ही घटना चित्रबद्ध करण्याचा निर्णय खगोलप्रेमींनी घेतला. यापूर्वी हे अवकाश स्थानक चंद्रासमोरून जाताना चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या अनुभवावरून ज्या काही तांत्रिक बाबी लक्षात आल्या होत्या, त्या विचारात घेऊन योग्य ती साधने वापरून ही घटना चित्रबद्ध करण्यात आणि त्याचे छायाचित्रीकरण करण्यात कोल्हापूरातील खगोलप्रेमींच्या या चमूला यश आले.
असे असते अधिक्रमण...
ग्रह-तारे भ्रमण करताना काही खगोलीय घटना घडून येत असतात. जसे चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी आली असतात 'चंद्रग्रहण' आपणास पहावयास मिळते, तसेच सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यास 'सूर्यग्रहण' आपल्यास पहावयास मिळते. काही वेळा अंतराने दूर असणारे ग्रह किंवा तारे जेव्हा चंद्राबिंबाच्या मागे जातात तेव्हा या घटनेस 'पिधान' झाले असे म्हटले जाते तर हीच घटना सूर्यासमोर घडली तर त्यला 'अधिक्रमण' झाले असे म्हटले जाते.