‘जीकेजी’वरील वर्चस्ववाद उफाळला

By admin | Published: September 8, 2015 12:26 AM2015-09-08T00:26:03+5:302015-09-08T00:30:38+5:30

दोन गट भिडले : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे धुमश्चक्री टळली

The supremacy of 'GKG' came to fruition | ‘जीकेजी’वरील वर्चस्ववाद उफाळला

‘जीकेजी’वरील वर्चस्ववाद उफाळला

Next

कोल्हापूर : गोखले कॉलेज परिसरात (जिकेजी) शनिवारी दोन गटांत हाणामारी झाली होती. त्याचे पडसाद सोमवारी सकाळी उमटले. मात्र, जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीमुळे दोन गटातील धुमश्चक्री पोलिसांनी वेळेवर येत रोखलीच शिवाय या तरुणांना लाठीचा प्रसाद देत ‘सळो की पळो’ करून सोडले. कॉलेजवर आमच्याच गटाचे वर्चस्व म्हणून जवाहरनगरातील आरसी गॅँगचा गट आणि परिसरातील एका नामांकित तालमीचे नाव घेणारा एक गट अशा दोन गटांत गेल्या कांही दिवसापासून धुसफूस सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका गटातील तरुणाला गंभीर मारहाण करण्यात आली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या गटाने त्यावेळी या घटनेची फिर्याद पोलिसांत दाखल केली नाही. मात्र, याचे पडसाद सोमवारी उमटले. सोमवारी कॉलेज परिसरात एका गटाने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घ्यायचा व पुन्हा प्रतिस्पर्धी गटातील तरुणांना मारहाण करायची, असा डाव दोन्ही गटांनी केला होता. मात्र, तत्पूर्वीच कॉलेज परिसरात जमलेली गर्दी पाहून आणि त्यातील तरुणांचा रूद्रावतार पाहून जागरूक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यावेळी मोठ्या आवाजात लावलेल्या डॉल्बीविषयीही माहीती दिली. तत्काळ दाखल झालेल्या पोलिसांनी तरुणांना पांगविण्यासाठी किरकोळ बळाचा वापर केल्याने तरुण वाट दिसेल त्या दिशेला पळत सुटले व मोठा अनर्थ टळला. गेले काही दिवस या परिसरात वर्चस्व कुणाचे यावरून दोन्ही गटांत वाद होत हाणामारी सुरू आहे. मात्र, पोलीस कोणतीच ठोस कारवाई करत नसल्याने दोन्ही गट अधिक आक्रमक होऊ लागले आहेत. पोलिसात फिर्याद न देता एकमेकाचे उट्टे काढण्याचे प्रकार होत असल्याने या परिसरात कायम तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. सोमवारी ही एकमेकाला टार्गेट करण्याचा या दोन्ही गटांचा डाव होता. या रोजच्याच हाणामाऱ्यांमुळे या परिसरातील शांतता भंग झाली असून पोलिसांनी या परिसरात कायम बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

तक्रारी वाढल्या पण ठोस कारवाई नाही
गोखले कॉलेजच्या बाहेर कॉलेजमधील विद्यार्थ्यांपेक्षा बाहेरीलच तरुणांची गर्दी सध्या वाढत आहे. त्यामुळे परिसरात कधी गाड्यांची तोडफोड, तर कधी तरुणांना मारहाण केली जात आहे. त्यात दररोज अशा घटना घडत असतानाही पोलीस लक्ष देत नसल्याची तक्रार येथील अनेक नागरिकांनी केली आहे. दररोजच्या या मारामारी व दहशतीच्या वातावरणामुळे या कॉलेजच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्यांची भांडणे आहेत ते तरुण भागातील एका तालमीचे नाव वापरतात. त्यामुळे अनेकदा तालमीचे नावही बदनाम होत आहे. या मारामारीत कुणाचा जीव गेला तर जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. जी मंडळी दहीहंडी व अन्य कार्यक्रम या परिसरात भरविते. तेही आपली जबाबदारी झटकून बाजूला जातात. ज्या विद्यार्थ्यांचा या दोन गटांशी काहीही संबंध नाही, असे विद्यार्थी पोलिसांचा मार खातात.

Web Title: The supremacy of 'GKG' came to fruition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.