राजाराम कारखान्यांच्या अपात्र सभासदांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पण..
By राजाराम लोंढे | Published: January 4, 2023 07:24 PM2023-01-04T19:24:54+5:302023-01-04T19:26:53+5:30
निवडणूक पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता
कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यांच्या अपात्र १३४६ सभासदांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरता दिलासा दिला. उच्च न्यायालयाने अपात्र ठरवलेल्या सभासदांना प्रादेशिक साखर सहसंचालकांसमोर पुन्हा म्हणणे मांडता येणार असून त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला असून त्यानंतर तीन महिन्यात पात्र,अपात्रतेबाबत सहसंचालकांना निर्णय घेता येणार आहे.
तत्कालीन प्रादेशिक साखर सहसंचालकांनी हे सभासद अपात्र ठरवले होते. सत्तारुढ गटाने या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. तिथेही सहसंचालकांचा निर्णय कायम राखण्यात आला. ७०९ सभासदांच्या वतीने सत्तारुढ गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर बुधवारी सुनावणी होऊन या सभासदांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांसमोर पुराव्यासह म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.
त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला असून यामध्ये त्यांनी म्हणणे सादर करायचे आहे. त्यानंतरच्या तीन महिन्यात साखर सहसंचालकांनी सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. नरसिंह यांच्या खंडपीठाने दिला.
या प्रक्रियेसाठी पाच महिने जाणार असल्याने निवडणूक पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे.