थकीत ३६ कोटींसाठी सर्वोच्च न्यायालयात
By admin | Published: August 14, 2015 12:35 AM2015-08-14T00:35:22+5:302015-08-14T00:35:22+5:30
‘दौलत’च्या सभासदांचा प्रश्न : संघटनेचे अध्यक्ष विजयभाई पाटील यांची माहिती
चंदगड : चार वर्षांपूर्वी बेळगाव येथील सह्याद्री व नवहिंद सोसायटीने थकीत कर्जापोटी तक्रार केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याची साखर जप्त केली होती. या जप्त केलेल्या साखरेचे व्याजासह ३६ कोटी रुपयांची रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी, यासाठी गुरुवारी दौलत सभासद संघटनेतर्फे सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याची माहिती दौलत सभासद संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजयभाई पाटील यांनी दिली.
१ फेब्रुवारी २०११ ते हंगाम संपेपर्यंतची साखर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी आॅगस्ट २०११ मध्ये जप्त केली होती. त्यानंतर या साखरेची विक्री केल्यानंतर २७ कोटी ९४ लाख रुपये रक्कम आली होती. या रकमेवर दावा सांगत बेळगावच्या नवहिंद व सह्याद्री पतसंस्थांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.मात्र, त्यानंतर प्रक्रिया लांबल्याने ही रक्कम ऊस पुरवठादार शेतकरी, तोडणी-ओढणी वाहतूदार यांना अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यांना ही रक्कम मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, प्रा. एन. एस. पाटील, अॅड. व्ही. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाने कॅप्टन गुंडोपंत कानडीकर (जंगमहट्टी), नारायण धामणेकर (मांडेदुर्ग), विष्णू आवडण (हलकर्णी), तुकाराम मुरकुटे (मुरकुटेवाडी) यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला.