ज्यांच्या ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात, सुप्रिया सुळे यांचा मंत्री मुश्रीफ यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 03:28 PM2024-09-23T15:28:05+5:302024-09-23T15:29:30+5:30
'समरजित घाटगे नव्या पिढीसाठी नवी स्वप्ने पाहणारे नेतृत्व'
कोल्हापूर : केवळ रस्ते बांधले म्हणजे विकास झाला असे नाही. पंचवीस वर्षे ज्यांनी लाल दिवा दिला. ज्यांच्या बरोबर ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना नाव न घेता लावला. पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या.
खासदार सुळे म्हणाल्या, आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत छत्रपती शाहू महाराजांचा विचार आणि वारसा पुढे नेणे काळाची गरज आहे. समरजित घाटगे सातत्याने हेच काम करीत आहेत. नव्या पिढीसाठी नवी स्वप्ने पाहणारे ते नेतृत्व आहे.
घाटगे म्हणाले, दिवंगत विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर यांनी या मतदारसंघाचा एक कुटुंब म्हणून विकास केला. त्यांचाच वारसा पुढे न्यायचा आहे. यावेळी जगदीश परीट, माणिक पाटील, ओम एकोंडे, रणजित कुराडे, वैभव लोकरे आदींची भाषणे झाली. राजेंद्र मोहिते यांनी स्वागत केले. रणजित वाडकर यांनी आभार मानले.
..हे जनतेला मान्य नाही
मी टीव्हीवर पाहिले, कागलमध्ये पुरुषमंडळी ईडीला घाबरून मागे राहिली; पण घरातील महिला भगिनी धैर्याने पुढे आली. कागलची जनता हे कदापि मान्य करणार नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.