विधवा प्रथा बंदबाबत कायद्यात रूपांतर होण्यासाठी पुढाकार घेणार - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:39 AM2022-05-10T10:39:27+5:302022-05-10T10:39:56+5:30
Supriya Sule : हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीने विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा ग्रामसभेत ठराव केला आहे. या ठरावाची माहिती घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरवाड सरपंच सुरगोंडा पाटील, ग्रामसेवक, महिला सदस्या यांना सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सभागृहात बोलावून घेतले.
कुरुंदवाड : विधवा महिलांना समाजात सन्मानाची वागणूक देण्याबाबत हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला चालना देणारा हा निर्णय राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्यातून होत आहे याचा अभिमान आहे. या ठरावाचे कायद्यात रूपांतर करून या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभर राबविण्याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. या क्रांतिकारी ठरावाची दखल राजकीय नेत्यांनी घेतली असून या निर्णयाला गती मिळणार आहे.
हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीने विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा ग्रामसभेत ठराव केला आहे. त्यामुळे या निर्णयाची राज्यभरात चर्चा होत असून निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
या ठरावाची माहिती घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरवाड सरपंच सुरगोंडा पाटील, ग्रामसेवक, महिला सदस्या यांना सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सभागृहात बोलावून घेतले. खासदार सुळे यांनी सरपंच पाटील यांच्याकडून ठरावाची माहिती घेतली. या निर्णयाबाबत कौतुक करत सुमारे एक तासहून अधिक काळ वेळ देत सविस्तर चर्चा केली. या ठरावाला राजकीय आश्रय मिळाल्याने विधवा महिलांच्या सन्मानाच्या प्रक्रियेला गती मिळणार हे निश्चित आहे.
हेरवाडकरांचे कौतुक
विधवा महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी विधवा, रूढी, परंपरेला मूठमाती देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव हेरवाड ग्रामपंचायतीने मांडला आहे. त्यामुळे या निर्णयाची राज्यभर चर्चा होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आदी रयत शिक्षण संस्था सातारा येथे सोमवारी आले होते. या ठिकाणी हेरवाड सरपंच सुरगोंडा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक यांना बोलावून शरद पवार यांच्या हस्ते सरपंच पाटील यांचा सत्कार करत धाडसी निर्णयाचे कौतुक केले.