विधानपरिषदेसाठी सुरेश हाळवणकर चर्चेत, देवस्थानच्या नियुक्त्यांचीही शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 12:16 PM2024-09-28T12:16:13+5:302024-09-28T12:16:44+5:30
मंगळवारी याचिकेवर सुनावणी
कोल्हापूर : आमदार प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत भाजपमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होणार आहे. त्यानंतर आठवडाभरात निर्णय अपेक्षित आहे.
हाळवणकर हे पश्चिम महाराष्ट्रातील जुन्या भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रतीक आहे. आवाडे यांचा भाजप प्रवेश त्यांनी पाच वर्षे रोखला. परंतु आवाडे हातातून निसटू नयेत म्हणून तातडीने हालचाली करत हाळवणकर यांना विधानपरिषदेचा शब्द देऊन आवाडेंचा पक्षप्रवेश करण्यात आला. परंतु बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेवेळी हाळवणकरांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आल्याचा दावा केला जात आहे. जुन्या नेते, कार्यकर्त्यांना पक्ष वाऱ्यावर सोडत नाही, असा संदेश देण्यासाठी हाळवणकर यांची नियुक्ती महत्त्वाची आहे, हे नेत्यांनाही पटल्याचे सांगण्यात येते.
महेश जाधव यांना देवस्थान..?
याच परिस्थितीत विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेल्या महेश जाधव यांना पुन्हा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या समितीचे खजिनदारपद आणि उर्वरित सात सदस्यपदीही महायुतीच्या तीनही पक्षातील नावे या आठ, दहा दिवसांत निश्चित होण्याची शक्यता आहे. कागलचे भैय्या माने हेदेखील यातील एका पदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जाते.