भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरेश हाळवणकर प्रबळ दावेदार, पक्षातून नाव चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 02:12 PM2022-07-08T14:12:17+5:302022-07-08T14:13:03+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. भाजपच्या संघटनेला ते चांगलेच परिचित आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर ते राज्यभर फिरू शकतात, वेळ देऊ शकतात.

Suresh Halvankar is a strong contender for the post of BJP state president | भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरेश हाळवणकर प्रबळ दावेदार, पक्षातून नाव चर्चेत

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरेश हाळवणकर प्रबळ दावेदार, पक्षातून नाव चर्चेत

Next

विश्वास पाटील

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश होण्याची शक्यता गडद झाल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना मिळण्याची शक्यता जास्त आहे. हाळवणकर सध्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. मराठा समाजातील ग्रामीण कार्यकर्त्यांना आपलासा वाटणारा नेता म्हणून त्यांचा विचार होऊ शकतो.

इचलकरंजीच्या राजकारणात विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते दोनवेळा उपनगराध्यक्ष, दोनवेळा आमदार आणि पक्षाचा झेंडा घेऊन तीस वर्षे एकनिष्ठ असणारा नेता अशी हाळवणकर यांची ओळख आहे. यापूर्वी २०१९ मध्येच जेव्हा चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा पक्षाने त्यांचे नाव निश्चित केले होते; परंतु त्यावेळी ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून लढणार होते. त्यामुळे त्या पदाला न्याय देता येणार नाही म्हणून त्यांनी स्वत:हूनच नकार दिला होता. परंतु आता त्यांची हे पद स्वीकारण्याची तयारी आहे.

कारण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आता त्यांच्यासाठी स्पेस नाही. अपक्ष निवडून आलेल्या प्रकाश आवाडे हे सध्या भाजपसोबत आहेत. क्षमता असताना व सहज शक्य असतानाही २०१४ ते १९ च्या काळात पक्षाने हाळवणकर यांना मंत्रीपद दिले नाही. त्यामुळे आता त्यांचा या पदासाठी प्राधान्याने विचार होण्याची शक्यता जास्त आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. भाजपच्या संघटनेला ते चांगलेच परिचित आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर ते राज्यभर फिरू शकतात, वेळ देऊ शकतात. त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्वही आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला बळ देण्यासाठीही म्हणूनही त्यांचे नाव या पदासाठी प्राधान्याने घेतले जात आहे.

आता की फेब्रुवारीत...

भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची फेब्रुवारी २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यावर चंद्रकांत पाटील यांच्याकडे राज्यातील मंत्रिपदे व प्रदेशाध्यक्षपदही सुरुवातीला सहा महिने होते. त्यानंतर त्यांनाच ही जबाबदारी दिली. त्याची मुदत फेब्रुवारी २०२३ ला संपते. त्यावेळी तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ते प्रदेशाध्यक्षापर्यंत सर्वच पदाधिकारी बदलावे लागतील; परंतु सध्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. अशा काळात पक्षाला पूर्ण वेळ देणारा नेता हवा असा विचार झाल्यास प्रदेशाध्यक्षपदाची निवड लगेच होऊ शकते.

Web Title: Suresh Halvankar is a strong contender for the post of BJP state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.