ओबीसीचा निकाल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी?, तारीख सांगत मंत्री पाटीलांनी स्पष्टच केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 17:49 IST2025-01-04T17:49:15+5:302025-01-04T17:49:46+5:30

इचलकरंजी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपेत जरी शब्द दिला असला तरी ते पाळतात. त्यामुळे मैदान बघून ठेवा, सुरेश ...

Suresh Halvankar will be appointed to the Legislative Council says Minister Chandrakant Patil | ओबीसीचा निकाल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी?, तारीख सांगत मंत्री पाटीलांनी स्पष्टच केलं

ओबीसीचा निकाल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी?, तारीख सांगत मंत्री पाटीलांनी स्पष्टच केलं

इचलकरंजी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपेत जरी शब्द दिला असला तरी ते पाळतात. त्यामुळे मैदान बघून ठेवा, सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर घेणार आणि त्यांच्या सत्काराला मी येणार, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच ओबीसीचा निकाल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबतही मंत्री पाटील यांनी स्पष्टच सांगितले.

येथील लायन्स क्लबमध्ये भाजपच्यावतीने मंत्री पाटील यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील आमदार, बूथप्रमुख यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश हाळवणकर होते. यावेळी कोअर समितीची घोषणा करण्यात आली.
आगामी काळात निवडणुका तसेच विविध निर्णय घेण्यासाठी तेराजणांची कोअर समितीची घोषणा मंत्री पाटील यांनी केली.

मंत्री पाटील म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वजण एकत्र आल्याने महापौर भाजपचा होण्यास काही अडचण नाही. मात्र, काही प्रश्न निर्माण झाले, तर ते सर्वांना एकत्र घेऊन सोडवणे आवश्यक आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जावे. काही वेळेला एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होणार. अन्याय झालेल्यांनी तो सहन करावा. आवाडे आपल्यासोबत कार्यकर्ते घेऊन आले आहेत. त्यांच्यातील कार्यकर्त्यांनाही न्याय द्यावा लागेल. आपले घर मोठे करण्यासाठी मंत्री व्हायचे नसते, तर सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री होणे अपेक्षित आहे.

हाळवणकर म्हणाले, काही लोक आमच्यात येऊन दुकान चालविण्याच्या नादात आहेत. मात्र, त्यांचे दुकान चालणार नाही. जे काम करतील, त्यांना उमेदवारी मिळेल. गाडी व बंगला बघून उमेदवारी मिळणार नाही. भले पराभवाला सामोरे जावे लागले तरी चालेल. आमदार राहुल आवाडे म्हणाले, आपण सुरुवातीपासूनच भाजपसोबत असून, आगामी काळात हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणू. उद्या कोल्हापूर जिल्ह्यातून विधान परिषदेवर जाणारा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल, असे वचन आपण देत असल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

यावेळी मंत्री पाटील, राहुल आवाडे, हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांचा सत्कार करण्यात आला. अमृत भोसले यांनी स्वागत व शहाजी भोसले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अशोकराव स्वामी, अरुण इंगवले, प्रकाश दत्तवाडे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, मिश्रीलाल जाजू, आदी उपस्थित होते.

१ फेब्रुवारीच्या अगोदर ओबीसीचा निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अनुसरून सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसीचा खटला सुरू आहे. त्याचा निकाल जानेवारी महिन्यात लागेल, असा आमचा व्होरा आहे. जे-जे हवे आहे, ते सरकारने न्यायालयात सादर केले आहे. २२ जानेवारीला याची सुनावणी आहे. २२ जानेवारी अथवा १ फेब्रुवारीच्या अगोदर याचा निकाल लागला, तर ३१ मेच्या आत या निवडणुका होण्यास काही अडचण वाटत नाही. असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

आमदारांनी फिरवली पाठ

भाजपच्यावतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यामध्ये सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, शिवाजीराव पाटील, राहुल आवाडे, अशोकराव माने यांचा समावेश होता. आवाडे व माने वगळता एकही आमदार या कार्यक्रमाला आला नाही. आमदारांनी पाठ फिरविल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.

दोघांनी आदर्श ठेवला

जेलमध्ये गेले, निवडून आले, पडले, राज्यात सरकार येणार असताना तिकीट नाकारले, त्याबद्दल त्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणता फरक पडत नाही. तसेच कुठल्याही परिस्थितीत आपल्या व्यवहारामध्ये कमी-जास्तपणा झालेला नाही, असे हाळवणकर व ज्यांना मंत्रिपद मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, अशावेळी उमेदवारी सोडून आपल्या मुलाला उमेदवारी दिली, ते प्रकाश आवाडे. या दोघांचा आदर्श घेण्यासारखे आहे.

Web Title: Suresh Halvankar will be appointed to the Legislative Council says Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.